संभाजीनगर: पोलिस उपायुक्तांच्या मुलाची आत्महत्या, आरशावर लिहिलेल्या ओळींनी वाढवले गूढ

Swarajyatimesnews

संभाजीनगरमध्ये रविवारी धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिस उपायुक्त शीलवंद नांदेडकर यांचा १७ वर्षीय मुलगा साहिल नांदेडकरने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. साहिलची आत्महत्या का झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याने आपल्या बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या आरशावर लिहिलेल्या काही ओळींनी या घटनेचे गूढ आणखी वाढवले आहे.

रात्री आई-वडिलांशी गप्पा आणि सकाळी धक्का – शनिवारी रात्री साहिलने आपल्या आई-वडिलांबरोबर सहजपणे गप्पा मारल्या. अभ्यास आणि इतर विषयांवर चर्चा केल्यानंतर तो नेहमीप्रमाणे झोपायला गेला. मात्र, रविवारी सकाळी साहिलचे वडील त्याला उठवायला गेले असता त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने नांदेडकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आरशावर लिहिलेल्या रहस्यमय ओळी – साहिलच्या आत्महत्येनंतर त्याच्या बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलच्या आरशावर तीन ओळी आढळून आल्या. त्या ओळी होत्या: “आय वॉन्ट टू रिस्टार्ट, आय डोन्ट क्विट! लव यू बोथ.” या ओळींमुळे साहिलच्या मनस्थितीबद्दल आणि त्याच्या या टोकाच्या निर्णयामागच्या कारणांबद्दल नवा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

तपास सुरु, मित्र-मैत्रिणींकडे चौकशी – पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली असून, साहिलच्या मोबाईल आणि इतर साधनांमधून तपास सुरु आहे. साहिलच्या मित्रमैत्रिणींशीही चौकशी करून या घटनेचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!