शिरूरच्या दिपाली शेळके व कुटुंबियांनी पाखरांसाठी खुलं केलं दोन एकर ज्वारीचं रान, गोफण थांबली, माणुसकी बोलू लागली
प्रतिनिधी राजाराम गायकवाड
पिंपळे (खालसा) वाढती महागाई, खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असतानाच, शिरूर तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा अनोखा ‘मळा’ फुलवला आहे. पिंपळे (खालसा) येथील बाळासाहेब शेळके आणि दिपाली शेळके या दांपत्याने आपल्या दोन एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक पाखरांसाठी खुले सोडून दिले असून, या पिकावर कोणतीही राखण न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.आजच्या व्यावसायिक युगात जिथे दाण्या-दाण्याचा हिशोब ठेवला जातो, तिथे शेळके दांपत्याने घेतलेला हा निर्णय परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.
माणुसकीचा आणि निसर्गाचा वारसा : बाळासाहेब शेळके हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. मात्र, केवळ पद आणि प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन निसर्गाप्रती आपली काही जबाबदारी आहे, या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला. यंदा त्यांच्या दोन एकर शेतात ज्वारीचे पीक डोलत आहे. सामान्यतः या काळात शेतकरी गोफण घेऊन पाखरांना पळवून लावण्यासाठी शेतात राखण करतो. मात्र, शेळके दांपत्याने या पिकावर पाखरांचा पहिला हक्क असल्याचे मानले आहे.

पाखरांचा मुक्त संचार : सध्या या शेतावर सकाळ-संध्याकाळ चिमण्या, कावळे, कबुतरे, साळुंकी आणि तितर यांसारख्या शेकडो पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. कोणत्याही भीतीविना हे पक्षी ज्वारीच्या ताटावर बसून दाणे टिपत आहेत. “निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, त्यातील काही अंश निसर्गाला परत करताना मिळणारे समाधान हे कोणत्याही आर्थिक नफ्यापेक्षा मोठे आहे,” अशी भावना बाळासाहेब शेळके यांनी व्यक्त केली.
“आर्थिक नुकसानीपेक्षा पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचे” : “शेतीतील खर्च वाढत असला तरी मुक्या प्राण्यांच्या अन्नाचा प्रश्न गंभीर होत आहे. दोन एकर ज्वारीतून आम्हाला काही उत्पन्न मिळाले असते, पण त्यापेक्षा या हजारो पाखरांचे पोट भरल्याने मिळणारा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. हा आमचा निसर्गसेवेचा एक छोटासा प्रयत्न आहे.”— दिपाली शेळके, महिला उद्योजक व शेतकरी.
समाजासाठी नवा आदर्श : शेळके दांपत्याच्या या उपक्रमाचे शिरूर तालुक्यातून कौतुक होत आहे. केवळ भाषणे न ठोकता प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या दांपत्याने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. ‘पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा’ या केवळ घोषणा न राहता, त्या प्रत्यक्षात कशा उतरवता येतात, हे या उपक्रमातून दिसून येते.
