शिरूर तालुक्यातील वरुडे येथे घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा मध्यरात्री गळा चिरून खून

Swarajyatimesnews

शिरूर म टा वृत्तसेवा

शिरुर तालुक्यातील वरुडे येथे मध्यरात्री एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरासमोरील कट्ट्यावर गाढ झोपेत असलेल्या बाळासो बबन तांबे (वय ४३) या तरुणाचा अज्ञात मारेकर्‍याने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत बाळासो आणि त्यांचे मोठे भाऊ प्रकाश तांबे हे दोघे आपल्या कुटुंबासह वरुडे येथील राणमाळ वस्तीवर राहतात. रात्री जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत झोपले होते, तर त्यांची वृद्ध आई ओट्यावर आणि लहान भाऊ बाळासो हा शेजारील कट्ट्यावर झोपला होता. मध्यरात्री सव्वाच्या सुमारास अचानक आईचा मोठा आरडाओरडा आणि रडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य जागे झाले.

प्रकाश तांबे यांनी तातडीने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र अज्ञात मारेकर्‍याने अत्यंत चालाखीने त्यांच्या घराचे दरवाजे बाहेरून कडी लावून बंद केले होते. घरातूनच आरडाओरडा केल्यानंतर वृद्ध आईने धावत जाऊन दरवाजाची कडी उघडली. प्रकाश यांनी बाहेर येऊन पाहिले असता, लहान भाऊ बाळासो हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. अज्ञात व्यक्तीने त्याच्या गळ्यावर गंभीर वार केले होते, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आईने अंधारात एका अज्ञात इसमाला घटनास्थळावरून पळून जाताना पाहिले.

या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकाश तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे वरुडे गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!