डिंग्रजवाडी (ता. शिरूर) जागतिक महिला दिनानिमित्त डिंग्रजवाडी येथे स्त्री-शक्तीचा जागर करणारा विशेष सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सत्कारासाठी पुष्पगुच्छांचा वापर न करता जिवंत रोपटी देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ‘बुके नको, रोप द्या’ या पर्यावरणपूरक संदेशाची अंमलबजावणी करत डिंग्रजवाडीने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

या सोहळ्याला पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या दिपाली राहुल गव्हाणे यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला सरपंच प्रसाद शांताराम गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते खंडू गव्हाणे आणि दत्तात्रय कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनी गावातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

महिलांच्या उपस्थितीने फुलून गेलेल्या या सोहळ्यात स्त्री-शक्तीचा सन्मान आणि निसर्ग रक्षणाची शपथ एकाच वेळी घेतली गेली. केवळ औपचारिकता न पाळता सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमाची संपूर्ण परिसरात कौतुकाने चर्चा होत आहे.

