वाडेबोल्हाईच्या शेकडो भाविकांना सविता श्रीकांत गावडेंनी घडवले ‘अष्टविनायक’ दर्शन

Swarajyatimesnews

भक्ती आणि सेवायज्ञाचा अभूतपूर्व सोहळा संपन्न!

वाडेबोल्हाई (ता. हवेली): “लोकसेवेचा वारसा जपत सामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणे हे खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे यांनी आपल्या भक्ती आणि सेवावृत्तीतून हेच सिद्ध केले आहे,” अशा शब्दांत ह.भ.प. अर्चना हेमंत नेवकर यांनी गावडे दांपत्याच्या कार्याचा गौरव केला.

श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथील ग्रामस्थ आणि माता-भगिनींसाठी माजी उपसरपंच तथा सरपंच पदाच्या इच्छुक उमेदवार सविता श्रीकांत गावडे व श्रीकांत गावडे मित्र परिवाराच्या वतीने दोन दिवसीय ‘विनामूल्य अष्टविनायक दर्शन’ यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी वाडेबोल्हाई क्रिकेट मैदानावरून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात या भक्ती सोहळ्याचे प्रस्थान झाले.

नियोजनबद्ध व्यवस्था आणि आपुलकीचा पाहुणचार – केवळ यात्रेचे आयोजन करून न थांबता, सविता गावडे यांनी प्रत्येक भाविकाची एखाद्या कौटुंबिक सदस्याप्रमाणे आस्थेने विचारपूस केली. प्रवासासाठी अतिशय आरामदायी बसची व्यवस्था करण्यासोबतच, चहा-नाश्ता आणि दोन्ही वेळच्या सात्विक भोजनाची घरगुती चवीची सोय करण्यात आली होती. २६ तारखेला थेऊरच्या श्री चिंतामणी चरणी नतमस्तक होऊन सुरू झालेला हा प्रवास मोरगाव, सिद्धटेक आणि रांजणगावमार्गे ओझरकडे मार्गस्थ झाला. ओझर येथील मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी लेण्याद्री, महाड आणि पाली येथील गणरायाचे दर्शन घेऊन यात्रेची सांगता पुन्हा थेऊर येथेच करण्यात आली. “ज्या चरणांपासून प्रवासाचा श्रीगणेशा झाला, तिथेच त्याची पूर्तता” या भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत ही वारी यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

धन्य काळ संत भेटी’ ओझरमध्ये हरिनामाचा गजर – यात्रेचा पहिला मुक्काम श्री क्षेत्र ओझर येथे झाला. सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात ह.भ.प. अर्चना नेवकर यांचे सुश्राव्य कीर्तन रंगले. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ‘धन्य काळ संत भेटी…’ या अभंगावर निरूपण करताना त्या म्हणाल्या, “समाजात आर्थिक सुबत्ता अनेकांकडे असते, पण ती सत्कारणी लावण्याची आध्यात्मिक ओढ आणि इच्छाशक्ती फार कमी लोकांकडे असते. सविता वहिनींचे हे सेवाव्रत आजच्या काळात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे.”

कीर्तनात त्यांनी संत भेटीचा महिमा सांगताना विविध दाखले दिले. “जगात सर्व काही मिळवणे सहज शक्य आहे, मात्र सत्पुरुषांची भेट दुर्मिळ असते. माऊलींच्या कृपेने सच्चिदानंद बाबांचे जीवन धन्य झाले आणि ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ सिद्ध झाला. नारद मुनींच्या भेटीने वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले. ज्यांना संतांचा सहवास लाभतो, त्यांचे जीवन मंगलमय होते,” असे विचार त्यांनी मांडले.

विकासाचा ‘विघ्नहर्ता’ संकल्प – या उपक्रमातून सविता गावडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. “माझ्या वाडेबोल्हाईतील मायबाप जनतेला अष्टविनायक दर्शन घडविण्याचे भाग्य मला लाभले, हाच माझ्यासाठी गणरायाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. राजकारण हे माझ्यासाठी केवळ समाजसेवेचे माध्यम असून, गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे एकमेव ध्येय आहे,” अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी वाडेबोल्हाई परिसरातील अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि शेकडो भाविक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!