पोलिस भरती करण्यासाठी आलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत, पुणे-नगर महामार्गावर रक्ताचा सडा
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज सायंकाळी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन फाट्याजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात मोठ्या वाहनाने (टेम्पो) दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या या युवकाचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक MH 15 EL 8688) वरील युवक उबेद सलमान शेख यांचा जागीच मृत्यू तर शिवसागर आदिक हा गंभीर जखमी झाला. . वाडा पुनर्वसन फाट्याजवळील स्पीड ब्रेकरपाशी आले असता, पाठीमागून येणाऱ्या एका मोठ्या चारचाकी वाहनाने त्यांना भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील युवक रस्त्यावर फेकले गेले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अपघात होताच संबंधित टेम्पो चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
बॅगेतील चादरीनेच झाकला मृतदेह : अपघाताची भीषणता पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले. मृत युवकाच्या जवळ असलेल्या बॅगेत कागदपत्रांची फाईल आणि काही कपडे होते. त्या बॅगेत असलेल्या चादरीनेच मृत युवकाचा मृतदेह झाकण्याची दुर्दैवी वेळ आली. या युवकाकडे सापडलेल्या आधार कार्डवरून ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. हे युवक पुण्यात सैन्य किंवा पोलीस भरतीची पूर्वतयारी करण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार गुपचे, पोलिस कॉन्स्टेबल विलास सरोदे, सामाजिक कार्यकर्ते शंकर कांबळे, गोरक्ष घावटे व इतर नागरिकांनी मदत केली.जखमीला तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत वाहनाच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न केले.
सदर गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या युवकाला तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी येथील वाढत्या अपघातांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. फरार टेम्पो चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
