महापालिकेचे रणशिंग फुंकले! १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल

Swarajyatimesnews

मुंबई , दि. १५ डिसेंबर – अखेर बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. राज्य निवडणूक आयोगाची बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या एकूण २८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, त्यापैकी १४४२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. आजपासून या सर्व महानगरपालिकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही अधिकृत घोषणा केली. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या काही काळापासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २७ महानगरपालिकांची मुदत संपली होती, तर जालना व आणखी एका नवीन महानगरपालिकेची भर पडली आहे. यामध्ये २८ महापालिका बहुसदस्यीय, तर बृहन्मुंबई महानगरपालिका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष महापालिकांकडे लागले होते. २ डिसेंबर रोजी मतदान झाले असले, तरी आरक्षणाच्या मर्यादांमुळे काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर निकालाबाबत उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर रोजी निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांची तारीख कधी जाहीर होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, सर्व निवडणुका ईव्हीएम मशिनद्वारेच घेतल्या जाणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज दाखल करण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर २०२५

अर्ज छाननी : ३१ डिसेंबर २०२५

उमेदवारी माघार : २ जानेवारी २०२६

अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी २०२६

मतदान : १५ जानेवारी २०२६

मतमोजणी व निकाल : १६ जानेवारी २०२६

अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक राहणार आहे.

राज्यातील ३ कोटी ७८ लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून, १ जुलै २०२५ रोजी अधिसूचित केलेली मतदार यादी अंतिम राहणार आहे. ही मतदार यादी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त असल्याने, त्यात नाव समाविष्ट किंवा वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला राहणार नाही.

एकूणच, महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आता १५ जानेवारीला मतपेट्यांमध्ये जनतेचा कौल बंद होणार, तर १६ जानेवारीला सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!