शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांत दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य वनसंरक्षकांनी नरभक्षक बिबट्याला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले असून पिंपरखेड आणि जांबुत येथे विशेष शूटर पथक तैनात करण्यात आले आहे.
रविवारी झालेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या बालकाचा मृत्यू झाला होता. अवघ्या पंधरा दिवसांत तीन मृत्यू झाल्याने नागरिकांचा संताप उफाळला. ग्रामस्थांनी संतापाच्या भरात वनखात्याच्या वाहनांची तोडफोड करून काही भागात जाळपोळ केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले की, “पिंपरखेड परिसरात सहा जणांचे शूटर पथक दाखल झाले आहे आणि आणखी तीन जण दाखल होणार आहेत. सायरन प्रणालीसाठी पिंपरखेड येथे पाच आणि जांबुत येथे तीन खांब उभारले आहेत. तसेच आठ नवीन पिंजरे बसविण्यात आले असून एकूण ४३ पिंजरे कार्यान्वित आहेत.”
बिबट्याच्या हालचालींमुळे शहरात भीतीचे सावट – दरम्यान, शिरूर शहरातील अमरधाम, सुशीला पार्क आणि सूरजनगर परिसरातही गेल्या काही दिवसांत बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. नदीकाठच्या सूरजनगर, खारे मळा, शनी मंदिर, लाटे आळी, कुंभार आळी आणि हल्दी मोहल्ला या भागांमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक भीतीने घराबाहेर पडत नाहीत.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली – बिबट्याच्या भीतीचा परिणाम शिक्षणावरही झाला आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याने पिंपरखेड, जांबुत, चांडोह, कोयमहालेवस्ती, ढोमेमळा, दाभाडेमळा, गाजरेझाप आणि वडनेर खुर्द येथील नऊ शाळा ओस पडल्या आहेत. शिक्षक उपस्थित असले तरी विद्यार्थी नसल्याने वर्ग सुरू होऊ शकले नाहीत, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी के. बी. खोडदे यांनी दिली.

शार्पशूटर पथकाची मोहीम सुरू – डॉ. चंद्रकांत मंडलिक, झुबीन तैहमुर पोस्टवाला आणि विनोद सोनावळे या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील शार्पशूटर पथक पिंपरखेड येथे दाखल झाले आहे. या पथकाकडे ड्रोन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे, शस्त्रास्त्रे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आहे. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले की, “बिबट्याला पकडण्यासाठी आणि निरीक्षणासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. आवश्यकतेनुसार पिंजरे आणि कर्मचारी वाढवले जातील.”
ग्रामस्थांचा संताप अनावर – बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी पिंपरखेड येथे बिबट नियंत्रण पथकाच्या बोलेरो वाहनाची (MH 14 KQ 3752) तोडफोड करून ती जाळली. त्यानंतर बेस कॅम्पवरील इमारतीतही दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यात वनखात्याचे साहित्य आणि उपकरणांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती वनसंरक्षक कार्यालयाने दिली आहे.
वनविभागासमोर मोठे आव्हान – गेल्या काही महिन्यांत शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांत १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पकडलेल्या बिबट्यांना माणिकडोह निवारण केंद्रात हलविण्याचे कामही आता अडचणीत आले आहे, कारण तेथे जागा संपल्याची माहिती मिळत आहे. पकडलेल्या बिबट्यांना पुन्हा गावाजवळ सोडल्याने ते पुन्हा गावात परतत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “गावांमधील लोकांचा आक्रोश, शाळा बंद आणि मालमत्तेचे नुकसान पाहता आता ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यावर शाश्वत उपायांची गरज आहे.”
