आदर्श ग्राम’साठी डिंग्रजवाडी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करावे – गट विकास अधिकारी महेश डोके

Swarajyatimesmews

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांकडून डिंग्रजवाडीच्या प्रगतीचे कौतुक

डिंग्रजवाडी (ता. शिरूर) —डिंग्रजवाडी गाव एकीने आणि सहकार्याने प्रगती करत आहे, हा उत्साह टिकवून ठेवत ग्रामस्थांनी विकासाचे आदर्श ग्राम होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी केले. शासनाच्या स्पर्धांमध्ये विजयी होणे हे केवळ निमित्त आहे, मात्र गावचा सर्वांगीण विकास हेच आपले अंतिम ध्येय असायला हवे असे आवाहन केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत स्पर्धेसाठी तपासणी करण्यासाठी व गावच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिंग्रजवाडीला भेट दिली. यावेळी गट विकास अधिकारी महेश डोके, समाज कल्याण अधिकारी प्रकाश देव्हढे, विस्तार अधिकारी गाडीलकर यांच्यासह सरपंच प्रसाद गव्हाणे, उपसरपंच सागर गव्हाणे, माजी सरपंच यशवंत गव्हाणे, ग्राम पंचायत अधिकारी रमेश जासूद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी गावातील शाळा, अंगणवाडी, मंदिरे आणि स्मशानभूमी परिसराला भेट देत विकास कामांची माहिती घेतली. ग्रामस्थांशी सुसंवाद साधत त्यांनी अभियानात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.

वृक्षारोपण व दिव्यांग बांधवांचा सन्मान: या भेटीदरम्यान, आंब्यांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आणि ‘प्रत्येक कुटुंबाला एक झाड’ या संकल्पनेनुसार वृक्ष वाटप सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, दिव्यांग बांधवांचा सन्मान करत त्यांना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, गावातील ज्येष्ठ दिव्यांग सत्यवान दगडू गव्हाणे यांना मान्यवरांच्या हस्ते आंब्याचे झाड देऊन वृक्ष वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

डिंग्रजवाडीच्या ग्रामस्थांमध्ये असलेली सकारात्मकता आणि एकीची भावना यामुळे हे गाव लवकरच विकासाचे एक उत्कृष्ट मॉडेल म्हणून उभे राहील, असा विश्वास या भेटीनंतर ग्रामस्थांनी व्यक्त केला.

 डिंग्रजवाडी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ अत्यंत उत्साही व गावच्या विकासाच्या हिताने प्रेरित आहेत. गावच्या विकासासाठी त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. गावाने अशीच एकी करत सहभाग घेतल्यास नक्कीच त्यांना मोठे यश मिळेल असा मला विश्वास वाटतो.- महेश डोके, गट विकास अधिकारी, शिरूर

 डिंग्रजवाडी गावातील नागरिकांना सर्व शासकीय योजना पुरवण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नरत राहू. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात विजयी होण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहभागाने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे.- सरपंच प्रसाद गव्हाणे ,डिंग्रजवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!