‘१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…’ शास्त्रज्ञांना लुटलं, नाशिकच्या तरुणाचा कारनामा

Swarajyatimes

पुणे – माझी नेत्यांसोबत ओळख आहे, राज्यपाल पद मिळवून देतो असे सांगत नाशिकमधील एका तरुणाने तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निरंजन सुरेश कुलकर्णी असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजकीय नेत्यांसोबत ओळख असल्याचे सांगत राज्यपाल पद मिळवून देतो असे सांगत तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाची नाशिक मध्ये फसवणूक करणाऱ्या निरंजन सुरेश कुलकर्णी (४०, रा. गंधर्वनगरी, नाशिक रोड) याला मध्यवर्ती शाखेने ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला १० दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तामिळनाडूतील चेन्नई जिल्ह्यातील रहिवासी नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी  (५६) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निरंजन याने १२ जानेवारीपासून मुंबई-आग्रा रोडवरील एका हॉटेलमध्ये भेटून गंडा घातला. संशयित निरंजन आणि नरसिम्मा रेड्डी यांची ओळख एका धार्मिक कार्यक्रमात झाली. त्यानंतर झालेल्या भेटीगाठीतून संशयित निरंजनने त्याची राजकीय पक्षातील नेत्यांसोबत ओळखी असल्याचे रे‌ड्डी यांना सांगितले. तसेच मी या राजकीय ओळखींचा वापर करून तुम्हाला कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देऊ शकतो. मात्र, त्या कामापोटी ‘सर्व्हिस चार्ज’ म्हणून मला १५ कोटी रुपये द्यावे लागतील, असा प्रस्ताव निरंजनने रेड्डी यांना दिला.

त्यावर विश्वास ठेवत रेड्डी यांनी निरंजन यास ६० लाख रुपये रोख स्वरूपात व ४ काेटी ४८ लाख ९९ हजार ८७६ रुपये निरंजनने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांंवर टाकले. दरम्यान, कागदपत्रांची छाननी करताना ते बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर रेड्डी यांनी निरंजनकडे पैशांची मागणी केली. त्यावर पैसे देण्यास नकार देत निरंजनने रेड्डी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे रेड्डी यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात निरंजनविरोधात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके , मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. आंचल मुद्गल यांनी तपास करीत संशयित निरंजन यास नागपूरमधून ताब्यात घेतले. निरंजन यास नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 संशयित निरंजन कुलकर्णी याने नाशिकमध्ये १०० एकर जमीन व चांदशी गावात प्लॉट असल्याचे खोटे दस्तावेज कागदपत्र बनवून नरसिम्हा रेड्डी यांना राज्यपालपदाचे आमिष दाखवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!