रुग्णाची तपासणी न करता फक्त व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे एका डॉक्टरसाठी चांगलेच महागात पडले आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, जिल्हा ग्राहक मंचाने डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयाला ३ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १५ हजार रुपये तक्रार खर्च देण्याचा आदेश दिला आहे.(A doctor has been found guilty of prescribing medicine on WhatsApp without examining the patient. The patient died due to this negligence, and the District Consumer Forum has ordered the doctor and the hospital concerned to pay Rs 3 lakh as compensation and Rs 15,000 as complaint costs.)
ही घटना पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाची असून, तक्रारदार डॉ. राजेश सिंग यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर ही तक्रार दाखल केली होती. २०१६ ते २०१९ दरम्यान रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारादरम्यान रुग्णाला त्रास वाढल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी रुग्णाची कोणतीही तपासणी न करता औषध बदलण्याचा आणि त्याचा डोस वाढवण्याचा सल्ला फक्त व्हॉट्सॲपद्वारे दिला होता. परिणामी, चुकीच्या औषधोपचारांमुळे रुग्णाची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
सुनावणीदरम्यान, रुग्णालय आणि डॉक्टर हे आपल्या कृतीचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. मंचाने या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणाचा निष्कर्ष काढला. यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेतला गेला. संबधित रुग्णालय व त्यांचे डॉक्टर यांची कृती वैद्यकीय निष्काळजीपणा व त्रुटी ठरते असा निष्कर्ष मंचाने सुनावणी अंती काढला. त्यासाठी वैद्यकीय तज्ञांची मते, याविषयावरचे तज्ञांचे लेखही विचारात घेतले. तक्रार मुदतीच्या बाहेर केली गेली हा रुग्णालय व त्यांच्या डॉक्टरांचा युक्तीवादही मंचाने फेटाळून लावला.
तक्रारदारांना मिळणार भरपाई – रुग्णालय आणि डॉक्टर यांना ३ लाख रुपये नुकसानभरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून १५ हजार रुपये देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत. याशिवाय ४५ दिवसांत ही रक्कम न दिल्यास दर महिन्याला ५ हजार रुपये अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे.
या प्रकरणी तक्रारदारांच्या वतीने ॲड. श्रीराम करंदीकर यांनी काम पाहिले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष विलास लेले यांनी ही माहिती दिली.