प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे बलशाली भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्रनिष्ठा आणि समर्पणाची भावना असणाऱ्या युवकांची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि शैक्षणिक संशोधन विभागाने आयोजित केलेल्या उद्बोधन कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक खाबडे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. शाकूराव कोरडे आदी उपस्थित होते.
डॉ. चाकणे यांनी आपल्या भाषणात युवकांना सेवा, त्याग आणि समर्पणाची भावना अंगी बाणवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, कमी होत चाललेली वाचन संस्कृती आणि मोबाईलचा अतिवापर समाजासाठी घातक असून त्यामुळे युवकांची एकाग्रता कमी होत आहे. अशा परिस्थितीत युवकांनी वाचन, लेखन, संभाषण आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेली ग्रामव्यवस्था निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक उत्तम व्यासपीठ आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात महेश ढमढेरे यांनी युवकांना आपले संस्कार आणि समृद्ध परंपरा जपण्याचा सल्ला दिला. भारत देशाला विकसित करण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी महाविद्यालयातर्फे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विवेक खाबडे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. शाकूराव कोरडे यांनी केले. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रिती पवार यांनी आभार मानले.
