प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील मलठण फाटा ते गणेगाव खालसा या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या रस्त्याची तातडीने डांबरमिश्रित खडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी केली आहे.
मलठण फाटा हा परिसर व्यापारीदृष्ट्या अत्यंत गजबजलेला चौक आहे. येथून बुरुंजवाडी, गणेगाव खालसा, वाघाळे आणि मलठण या गावांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच, राऊतवाडी, ताजणेवस्ती आणि वाबळेवाडी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जिल्हा परिषद शाळेत जाणारे विद्यार्थी व नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, सध्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, आदळआपटीमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही मोठ्या अपघाताची वाट न पाहता संबंधित विभागाने या खड्ड्यांची डांबरमिश्रित खडी वापरून दुरुस्ती करावी, अशी पंढरीनाथ गायकवाड यांनी मागणी केली आहे.
बुरुंजवाडी, गणेगाव खालसा, वाघाळे व मलठणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत. शालेय विद्यार्थ्यांची कोंडी: वाबळेवाडी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कूल बस आणि सायकलस्वारांना खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास होत असून तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार डांबरीकरणाने खड्डे बुजवावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
