१५ गावांतील नागरिकांना मिळणार दिलासा
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
लोणीकंद (ता. हवेली) सामान्य नागरिकांच्या दैनंदिन महसुली अडचणी आणि प्रलंबित शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबवण्यात येत आहे. या भव्य शिबिराचा शुभारंभ सोमवार, १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा थेट जनतेच्या दारी नेणाऱ्या या उपक्रमामुळे लोणीकंद परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष (उत्तर) प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. कुस्तीगीर संघाचे संदिप भोंडवे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितिचे माजी उपसभापती रविंद्र कंद, पुणे जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, हवेली पंचायत समितीच्या सदस्या मोनिका श्रीकांत कंद, पंचायत समिती सदस्या राणी दत्तात्रय वाळके यांसह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये रेशन कार्डमधील बदल, तहसीलदार उत्पन्न दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे जातीचे व नॉन-क्रिमिलेअर दाखले, तसेच अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्रे जागेवरच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती, वारस नोंद आणि तुकडेबंदी निर्णयानुसार प्रलंबित असलेल्या नोंदींचा प्रश्न या माध्यमातून सोडवला जाणार आहे. याशिवाय संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्जही या ठिकाणी स्वीकारले जातील.
लोणीकंद, पेरणे, भावडी, फुलगाव, तुळापूर, निरगुडी, वडगाव-शिंदे-काकडे, बकोरी, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी-सांडस, वढू खुर्द या गावातील नागरिकांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह आणि त्यांच्या छायांकित प्रतींसह लोणीकंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बहुउद्देशीय इमारतीत उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पेरणे-लोणीकंद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, पंचायत समिती सदस्या मोनिका कंद, राणी वाळके नेहमीच अग्रभागी असतात. प्रशासकीय स्तरावर होणारी दप्तरदिरंगाई दूर करून, सर्वसामान्यांची कामे विनासायास आणि पारदर्शकपणे पूर्ण व्हावीत, यासाठी त्यांनी या ‘महाराजस्व समाधान शिबिरा’साठी विशेष पाठपुरावा केला आहे.
शासनाच्या प्रत्येक लोककल्याणकारी योजनेचा लाभ माझ्या गटातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हा आमचा मानस आहे. विशेषतः शेतकरी आणि कष्टकरी बांधवांना कागदपत्रांच्या अभावामुळे योजनांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी त्यांना सर्व दाखले व कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.”
— पै. किरण साकोरे (सदस्य, पुणे जिल्हा परिषद)

