डार्ट चुकला… वनरक्षकांवर बिबट्याचा हल्ला … मग शार्प शूटरने घातल्या गोळ्या...
शिरूर :शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शेवट झाला आहे. दोन लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेला बळी घेणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते.रविवारी मध्यरात्री, थरारक पाठलागानंतर शार्प शूटरच्या अचूक नेमाने या बिबट्याचा शेवट झाला. त्यामुळे शिरूर-पिंपरखेड परिसराने अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पिंपरखेड हादरले, रोहनचा मृत्यू आणि संतप्त ग्रामस्थ – १३ वर्षीय रोहन विलास बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थ आक्रोशित झाले आणि ‘नरभक्षकाला ठार मारा’ अशी मागणी जोर धरू लागली. वनविभागाने ड्रोन, कॅमेरा ट्रॅप आणि थर्मल सेन्सरच्या मदतीने शोधमोहीम राबवली.
रात्री साडेदहाच्या सुमारास घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर बिबट्याचे लोकेशन मिळाले. त्याला डार्टने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, पण तो चवताळला आणि थेट वनकर्मचाऱ्यांवर झेपावला. शार्पशूटरने अचूक नेम साधत गोळी झाडली आणि बिबट्या जागीच ठार झाला.
पाच ते सहा वर्षांचा नर बिबट्या ठार – ठार झालेल्या बिबट्याचे ठसे नरभक्षक बिबट्याशी जुळल्याचे स्पष्ट झाले. तो अंदाजे ५–६ वर्षांचा नर बिबट्या होता.
कारवाईत उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस व अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, तसेच रेस्क्यू टीम व ग्रामस्थांचा सहभाग होता. ही मोहिम वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली.
ग्रामस्थांना दाखवले शव; तपासासाठी माणिकडोहला हलवले – कारवाईनंतर बिबट्याचे शव ग्रामस्थांना दाखवण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी ते माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले. या कारवाईनंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने वनविभागाचे अभिनंदन केले.
जिल्ह्यातील बिबटे वनतारा केंद्रात हलवले जाणार – दरम्यान, जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी राज्य सरकारकडे तातडीने उपाययोजना सुचवल्या असून त्यानुसार, पुणे जिल्ह्यात पकडले जाणारे बिबटे वनतारा केंद्रात हलविण्याची प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे.
राज्याच्या सचिवांनी केंद्र सरकारच्या वन विभागाशी संवाद साधून साधला असून या पुणे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने असलेल्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी मोठी व्यापक मोहिम राबवण्यात येत असून ७०० पिंजरे मागवले आहे. व्यापक प्रमाणावर बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे.
