तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ, आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सात्रस यांना हा सन्मान मिळाला.
राजेंद्र सात्रस यांनी पत्नी उरळगावच्या माजी आदर्श सरपंच सुरेखा सात्रस यांच्या समवेत हा पुरस्कार स्वीकारला.उरळगावचे सुपुत्र राजेंद्र सात्रस यांनी आपल्या ग्रामविकासाच्या कार्यकाळात विविध गावांमध्ये महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत. गरिबांना घरकुल वाटप, विधवा महिलांना पेन्शन, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर कार्यरत राहून, गरजूंना धान्य किटचे वाटप, आरोग्य शिबिरे, स्मशानभूमी सुशोभीकरण, आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी सात्रस यांना ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्री शिवानी नाईक, दक्ष मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, उपसंपादक आदित्य श्रीमंदिलकर, ॲड. सतीश कांबळे, शोभाताई बल्लाळ, बाळकृष्ण नेहरूकर, संभाजी जामदार, आणि एकनाथ कोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शासकीय कर्तव्य बजावत असताना माणुसकी जपत, गोर गरिबांच्या मदतीला तत्पर असणारे व विकासाचा नाविण्यपूर्ण दृष्टिकोन असणारे , शास्वत विकासाला प्राधान्य देत गावाची सर्वांगीण प्रगतीचा ध्यास असणारे मनमिळावू कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांची ओळख असून या पुरस्काराने त्यांच्या कार्याची दखल घेत योग्य व्यक्तीची निवड झाल्याची प्रतिक्रिया देत राजेंद्र सात्रस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.