दिनांक २९ जानेवारी गेल्या तीन वर्षांपासून पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेचे नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाकडून मुखई (ता.शिरूर) येथे ग्रामस्वच्छता सेवा सप्ताह आयोजित केला जातो. दरवर्षी ३० ते ३५ विद्यार्थी संख्येच्या सहभागाने गावात अनेक रचनात्मक बदल व कामे झाली. यात गावातील सर्व कुटुंबांची आर्थिक सर्व्हेक्षणे, प्रत्येक वर्षी एक माती बंधारा, सुमारे ३०० झाडांचे वृक्षारोपन, मोफत आरोग्य तपासणी, संपूर्ण ग्रामस्वच्छता, मंदिरे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन अशी कामे झाली असून यावर्षी वरील कामांबरोबरच २०० आश्रमशाळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, गावातील जिल्हा परिषद शाळा व संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यास वर्ग, परीक्षेला सामोरे जाण्याचे मार्गदर्शन, सोशल मिडीया व रॅगींग बाबतची जागृती कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांनी घेतली.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीराचे दरम्यान मुखई (ता.शिरूर) येथे पुण्यातील नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावस्वच्छता, सर्व मंदिरे स्वच्छता, एक माती बंधारा, गावातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक सर्व्हेक्षण आणि २०० विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी उपक्रम पार पाडले. सात दिवसांच्या या ग्रामसेवा निवासी शिबीरात सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी इतके समरस झाले की, परतताना आम्ही मुखईकर झाल्याच्या भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या होत्या.शिबीर उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड.अशोक पलांडे, संस्थाध्यक्षा जयश्री पलांडे, सरपंच रमेश पलांडे, ज्ञानेश्वर पलांडे, प्राचार्य तुकाराम शिरसाठ, मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे, बी.के.लगड, प्रशासन अधिकारी मंगेश मोरे आदींचे उपस्थितीत पार पडले.
संपूर्ण सात दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात शिवदत्त वावलकर , राजेंद्र जमदाडे , ॲड.सुषमा कदम , अनुज मोदी,ॲड.प्रणव जोशी,ॲड.हर्षजित जाधव आदींची विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने पार पडली. शिबीर समारोप हा प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठीचा खराब रस्ता पुन्हा बांधणीने करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ.सुनिता आढाव, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.नीता आहेर, प्रा.अजिंक्य वाघमारे व संस्था समन्वयक श्रीकांत विंचु आदी उपस्थित होते. विद्यार्थी संयोजन समितीचे विद्यार्थी स्नेहा गुंड, आर्यन जाधव, रोहन दिवे, मानसी कापरे आदींसह सव विद्यार्थ्यांनी शिबीर यशस्वीतेसाठी योगदान दिले. परतीच्या प्रवासात सर्व विद्यार्थ्यांनी पाबळ (ता.शिरूर) येथील विज्ञान आश्रममधील रोजगाराभिमुख दोनशे संशोधनांची पाहणी केली.