शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोलीत वॉटर राईड बेतली जीवावर; महिलेच्या मणक्याचे चार तुकडे, अर्धे शरीर निकामी

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

सुटीचा आनंद लुटण्यासाठी सहलीला गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मोराची चिंचोली येथील ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात’ वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३७ वर्षीय महिलेच्या पाठीच्या मणक्याचे चार तुकडे झाले आहेत. व्यवस्थापनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे या महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले असून, याप्रकरणी पर्यटन केंद्राच्या मालक व व्यवस्थापकावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी संदीप नप्ते (वय ३७, रा. चिंचवड; मूळ रा. करंदी, ता. शिरूर) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी किरण मल्हारी नप्ते यांनी फिर्याद दिली आहे. नप्ते कुटुंब सहलीसाठी जय मल्हार पर्यटन केंद्रात गेले होते. यावेळी वॉटरपार्कमध्ये एका स्लाइडवरून घसरताना अश्विनी नप्ते या खाली असलेल्या पाण्यात जोरात आपटल्या. ज्या ठिकाणी त्या पडल्या, तिथे पाण्याची पातळी अत्यंत कमी होती. या धक्क्यामुळे त्या जागीच बेशुद्ध पडल्या आणि त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.

वैद्यकीय सुविधेचा अभाव; संताप व्यक्त – दुर्घटना घडल्यानंतर संबंधित पर्यटन केंद्रात कोणतीही तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे जखमी अश्विनी यांना रुग्णालयात पोहोचवण्यास मोठा विलंब झाला, परिणामी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. या व्यवस्थापनाविरुद्ध परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!