मुंबई – शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंपांमधून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकरी सौर पॅनेल्सद्वारे निर्मित अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये विकू शकतील, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या वेबसाईट आणि माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करताना फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
वीज कनेक्शनसाठी प्रतीक्षेचा अंत – सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना आता वीज कनेक्शनसाठी प्रतीक्षा न करता थेट ९० टक्के अनुदानासह सौर कृषिपंप मिळणार आहे. यामुळे २५ वर्षे वीज निर्मिती करता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल वाचणार आणि त्यांना अतिरिक्त वीज विक्रीतून उत्पन्नही मिळेल.
सौर उठेतून मिळणार शेतकऱ्यांना उत्पन्न – उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी स्पष्ट केले की, सौर कृषिपंपाच्या पॅनेल्सद्वारे तयार होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये विकली जाऊन शेतकऱ्याला नियमित उत्पन्न मिळेल. “वीजबिल भरणारा शेतकरी आता वीज विकून उत्पन्न मिळवणार आहे,” असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १२ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे करार झाले असून, आगामी दोन वर्षांत त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल.
पर्यावरणपूरक आणि हरित ऊर्जा – शेतकऱ्यांना सिंचनासाठी १०० टक्के सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा मिळेल, तसेच अनुदान आणि क्रॉस सबसिडीच्या रकमेतही बचत होईल.
या प्रसंगी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे अध्यक्ष संजीवकुमार, उपमुख्यमंत्र्याचे सचिव श्रीकर परदेशी आणि एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.
.