कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे आणि रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार
पेरणेफाटा (ता. हवेली) : भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, येत्या १ जानेवारी २०२६ रोजी शौर्यदिनी कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक विजयरणस्तंभावर संविधान मूल्यांचा जागर करणारी विशेष सजावट साकारण्यात येणार आहे. ‘घर घर संविधान’ आणि ‘हमारा संविधान, हमारा स्वाभिमान’ या राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून ही सजावट लोकशाही, समता आणि बंधुतेचा संदेश देणारी ठरणार आहे.
ही सजावट विवेक बनसोडे यांच्या संकल्पनेतून साकारली जात असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मान्यतेने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. निळ्या फुलांच्या आकर्षक पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे शिल्पात्मक सादरीकरण, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र, तसेच ‘सत्यमेव जयते’ या घोषवाक्यासह राष्ट्रीय बोधचिन्ह अशोका स्तंभ सजावटीचे मुख्य आकर्षण असणार आहे. यासोबतच डौलाने फडकणारा भारतीय राष्ट्रध्वज सजावटीला विशेष शोभा देणार आहे.

सजावटीत संविधानाची मूलभूत मूल्ये — न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व— ठळकपणे मांडण्यात येणार आहेत. तसेच सजावटीच्या खालच्या भागात महार रेजिमेंटचा लोगोआणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली भेट दिलेले ऐतिहासिक तेलचित्र नागरिकांना पाहता येणार आहे.
हा उपक्रम कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे आणि रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार होत आहे. अमृत महोत्सवी वर्षात होणारी ही सजावट संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आणि समाजात एकात्मतेचा संदेश देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
