पूर्व हवेलीत प्रदिप कंदांचा ‘पॉवर गेम’; पेरणे-लोणीकंदात विरोधक चितपट, कमळाचा झंझावात!
लोणीकंद: (ता.हवेली) हवेली तालुक्याच्या राजकीय पटलावर अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चुरशीच्या व लक्षवेधी लढतीत भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि या भागाचे खंबीर नेतृत्व प्रदिप विद्याधर कंद यांच्या सूक्ष्म नियोजनाने आणि ‘किंगमेकर’ भूमिकेने पूर्व हवेलीत पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळला असून, या विजयाने कंद यांचे राजकीय वर्चस्व निर्विवादपणे अधोरेखित झाले आहे.
या रणधुमाळीत भाजपने मिळवलेले यश खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरले आहे:
जिल्हा परिषद गट: पैलवान किरण संपतराव साकोरे यांनी १५,२३४ मते घेत ३,०५१ मतांच्या फरकाने विरोधकांना धोबीपछाड दिली.
लोणीकंद पंचायत समिती गण: मोनिका श्रीकांत कंद यांनी ८,७२२ मते मिळवत ४,४८६ मतांचे विक्रमी मताधिक्य प्राप्त केले.
पेरणे पंचायत समिती गण: राणी दत्तात्रय वाळके यांनी ७,२६७ मते मिळवून २९२ मतांनी विजय खेचून आणला.
हा विजय केवळ मतांच्या आकड्यांपुरता मर्यादित नसून, तो कंद यांनी विणलेल्या नातेसंबंधांच्या जाळ्याचा आणि कार्यकर्त्यांच्या अभेद्य फौजेचा विजय मानला जात आहे. कुस्तीगीर संघाचे संदीप भोंडवे यांनी आखलेला राजकीय ‘निकाला डाव’ आणि माजी उपसभापती रविंद्र कंद यांची मिळालेली भक्कम पाठराखण या विजयाचे प्रमुख आधारस्तंभ ठरले. या लढाईत माजी सभापती ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाळके, संजीवनी वाळके आणि सरपंच सुनील वागसकर यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती.
- विजयाची प्रमुख सूत्रे:
- अचूक नियोजन: प्रदिप कंद यांची सूक्ष्म निवडणूक यंत्रणा आणि रणनीती.
- पैलवानकीचा दांडगा अनुभव: संदीप भोंडवे यांचे राजकीय डावपेच.
- स्वच्छ प्रतिमा: पैलवान किरण साकोरे यांचा जनसंपर्क आणि मृदू स्वभाव.
- नातेसंबंधांचे जाळे: गावागावातील पाहुण्या-रावळ्यांची मिळालेली भक्कम साथ.
प्रदिप विद्याधर कंदांनी ज्या पद्धतीने ही राजकीय खेळी हाताळली, त्याने विरोधकांच्या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पाडले आहे. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण पेरणे-लोणीकंद परिसर ‘प्रदिप दादा’ आणि ‘भाजप’च्या घोषणांनी दणाणून सोडला. या विजयामुळे पूर्व हवेलीतील भाजपचा वारू आता अधिक वेगाने धावणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
