राजपथ ते कर्तव्यपथ: वाघोलीतील बीजेएसच्या स्वराज भंडारेला राष्ट्रपतींना सलामी देण्याचा बहुमान

Swarajyatimesnews

वाघोली, (ता. हवेली): नवी दिल्ली येथे होणाऱ्या २६ जानेवारी २०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट स्वराज भंडारे याची निवड झाली आहे. देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या संचलनात कर्तव्यपथावर मार्च करत स्वराज राष्ट्रपतींना सलामी देणार असून, त्याच्या या यशामुळे शिरूर तालुका व पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

निवड प्रक्रिया आणि सन्मान: प्रजासत्ताक दिन संचलनातील निवडीसाठी एनसीसी कॅडेट्सना अत्यंत कठीण शारीरिक आणि मानसिक चाचण्यांना सामोरे जावे लागते. ड्रिलमधील अचूकता, कडक शिस्त आणि नेतृत्वगुण यांच्या आधारे देशभरातील विविध संचालनालयांमधून सर्वोत्तम कॅडेट्सची निवड केली जाते. स्वराजने आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र संचालनालयाच्या वरिष्ठ विंग तुकडीत स्थान मिळवले आहे. २६ जानेवारी रोजी कर्तव्यपथावर संचलन करताना तो तिरंग्याला आणि सशस्त्र दलांच्या सर्वोच्च सेनापती, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मानवंदना देणार आहे.

शेती आणि कष्टाचा वारसा: स्वराज हा मूळचा शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील रहिवासी आहे. त्याचे वडील संजय भंडारे एका खासगी कंपनीत कार्यरत असून आई लता भंडारे गृहिणी आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबातील स्वराजने बी.एस्सी. (द्वितीय वर्ष) शिक्षण घेताना एनसीसीमध्ये मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे.

बीजेएस महाविद्यालयाची परंपरा: बीजेएस महाविद्यालयात गेल्या चार वर्षांपासून ‘३ महाराष्ट्र नौदल एनसीसी’ विभाग कार्यरत आहे. दरवर्षी ७० कॅडेट्सना येथे कडक प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी कॅडेट कॅप्टन पवन राठोड यानेही ऑल इंडिया नौसैनिक शिबिरात महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. आता स्वराजच्या निवडीने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

कौतुकाचा वर्षाव: या यशाबद्दल महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्राचार्या डॉ. मनीषा बोरा, कमांडर आपलेश मोहन, एनसीसी अधिकारी सब लेफ्टनंट डॉ. शिवाजी सोनवणे, मुख्य प्रशिक्षक निखिल मोरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वराजचे अभिनंदन केले आहे. “स्वराजची निवड ही केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे,” अशी भावना प्राचार्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!