राज्याच्या राजकारणात ‘दादा’ म्हणून दरारा असलेले लोकनेते अजित पवार यांच्या निधनानंतर केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला मतदानातून अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या हायव्होल्टेज लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी ९०३४ इतक्या प्रचंड मताधिक्य मिळवत विजयाचा गुलाल उधळला.

विजय मोठा, पण आनंद पोरका! : निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष तर केला, पण या उत्साहात विजयाचा उन्माद नव्हता, तर आपल्या नेत्याच्या विरहाचे दुःख होते. सुरेखा हरगुडे यांचा विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “विजयी झालो आहोत याचा सार्थ अभिमान आहे, पण हा विजय पाहण्यासाठी आमचे ‘दादा’ आज आपल्यात नाहीत,” अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

मतदानातून श्रद्धांजली: केसनंद-कोरेगाव मूळ गटातील मतदारांनी ही निवडणूक केवळ निवडणूक म्हणून न लढवता ती अजित पवारांना वाहिलेली एक ‘भावनिक श्रद्धांजली’ म्हणून पाहिली.
संयम आणि साधेपणा: विजयानंतर कोठेही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली नाही किंवा मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजवण्यात आले नाहीत.
अजित पवारांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला: गुलाल उधळताना कार्यकर्त्यांनी केवळ अजित पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्या, जणू काही हा विजय त्यांनाच समर्पित केला जात होता.
