कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणातून राष्ट्रीय स्तरावर कामगिरी
वाघोली, १० सप्टेंबर २०२५ : भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थी आणि ३ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीचा कॅडेट कॅप्टन पवन राठोड याने लोणावळा येथील इंडियन नेव्हल शिप (INS) शिवाजी येथे झालेल्या अखिल भारतीय नौसैनिक शिबिर २०२५ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सर्वांचे कौतुक मिळवले आहे.
देशभरातील तब्बल १.५ लाख एनसीसी कॅडेट्समधून निवडलेल्या ६०० कॅडेट्समध्ये पवनची निवड झाली. शिप मॉडेलिंग स्पर्धेत त्याने दाखवलेल्या अप्रतिम कौशल्यामुळे महाराष्ट्राचा आणि बीजेएस महाविद्यालयाचा मान राष्ट्रीय स्तरावर उंचावला.

या शिबिराचे उद्घाटन मेजर जनरल विवेक त्यागी (एडीजी, एनसीसी, महाराष्ट्र) यांच्या हस्ते २ सप्टेंबर रोजी झाले. १३ सप्टेंबरपर्यंत चाललेल्या या शिबिरात कॅडेट्सना बोट पुलिंग, शिप मॉडेलिंग, ड्रिल, व्हेलर-बोट रीगिंग, सेमाफोर, सेवा स्पर्धा, व्याख्याने व कार्यशाळांद्वारे नौदल जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्रातून शिप मॉडेलिंगसाठी केवळ तीनच कॅडेट्सची निवड झाली होती, त्यात पवनचा समावेश होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्याने या स्पर्धेसाठी सातत्यपूर्ण सराव व अथक परिश्रम घेतले. प्रशिक्षक ऋतुजा कणसे (पुणे), उद्धव कबीर (रत्नागिरी), ३ महाराष्ट्र नेव्हल युनिटमधील प्रशिक्षक राजू खान व अमानदीप सिंग, मुख्य प्रशिक्षक निखिल मोरे तसेच एएनओ लेफ्टनंट कमांडर प्रा. प्रमोद शिंदे आणि लेफ्टनंट कमांडर सुदर्शन भूषण यांच्या मार्गदर्शनाचा त्याला लाभ झाला.
पवनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, एनसीसी युनिटचे अधिकारी सब लेफ्टनंट डॉ. शिवाजी सोनवणे, वाणिज्य विभाग प्रमुख बळवंत लांडगे, कार्यकारी अधिकारी डॉ. रवींद्रसिंह परदेशी, वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री. सुरेशजी साळुंके, ३ महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर आपलेश मोहन आणि बीजेएस व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले. सहाध्यायी विद्यार्थ्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणातून मिळालेल्या या यशाने पवन राठोडने महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. त्याचा हा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
