पुणे जिल्ह्यातील एक असा उमेदवार ज्याचा अख्ख्यच्या अख्ख गावच करतेय प्रचार
भाडोत्री कार्यकर्त्यांना फाटा; घरचा डबा, कांदा-भाकरी खाऊन आपल्या ‘सूनबाईंसाठी’ अख्खं गाव मैदानात, सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारा संकल्पनामा भावतोय मतदारांना
डिंग्रजवाडी (ता. शिरूर): पुणे जिल्ह्याच्या राजकारणात , दारू, मटण,पंच पक्वान्नाच्या भोजनावळींचे थाट आणि ‘पाकीट’ संस्कृतीचा उच्छादाला उधाण येत असताना, शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी या गावाने निष्ठेचे एक असे ‘नंदनवन’ उभे केले आहे की, ज्याची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आहे. ही बातमी केवळ एका उमेदवाराची नाही, तर ती आहे आपल्या लोकनेत्यासाठी उंबरठा ओलांडून रस्त्यावर उतरलेल्या एका संपूर्ण ‘कुटुंबाची’ म्हणजेच डिंग्रजवाडी गावाची! जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या गावच्या उमेदवार दिपाली राहुल गव्हाणे यांना विजयी करण्यासाठी आज अख्ख्या गावाने घरोघरी प्रचाराची ‘वारी’ सुरू केली आहे.
ही वारी आहे गावच्या एकीची, निष्ठेची, एकमेकांशी असलेल्या बांधिलकीची, गावालाच कुटुंब मानणाऱ्या निष्ठावंताची, गावकी भावकी एक करून अशक्य करणारे सहज शक्य करणारे, एकमेकांशी निस्वार्थ नातं निभावणारे जिवलगांची राजकीय वारी आहे. येथे पक्षाचा झेंडा आणि विकासाचा अजेंडा आहे. जनता जनार्दन देवतांची पूजा करताना विकासाचा संकल्पनामा करणारी आहे.
निष्ठेचा अनोखा जागर :गावातील वातावरण एखाद्या वारीसारखे झाले आहे. हातात झेंडे नाहीत, तर मनात विकासाचा ध्यास घेऊन प्रत्येक ग्रामस्थ दिपाली गव्हाणे यांचा ‘सोबती’ बनून फिरत आहे. माजी सरपंच राहुल गव्हाणे यांच्या स्वच्छ प्रतिमेची आणि सुसंस्कृत नेतृत्वाची पुण्याई या प्रचारात स्पष्टपणे दिसून येत आहे. डिंग्रजवाडीने इंचभर जमीन न विकता जशी समृद्धी मिळवली, तशीच इंचभर निष्ठाही न ढळू देता हे गाव आज दिपाली गव्हाणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
घरोघरी विजयाचा निर्धार : गावातल्या आया-बहिणींनी दिपाली राहुल गव्हाणे यांना ‘कुटुंबाची लेक’ मानले असून, त्यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली आहे. “आमच्या गावची सून जिल्हा परिषदेत जाणारच,” हा निर्धार डिंग्रजवाडीच्या प्रत्येक उंबरठ्यावर ऐकायला मिळत आहे. ही केवळ निवडणूक राहिली नसून, ती डिंग्रजवाडीच्या गावपणाची आणि अस्मितेची लढाई बनली आहे.
स्वच्छ प्रतिमेचा, विकासात्मक राजकारणाचा संस्कार असणारे नेतृत्व : माजी सरपंच राहुल गव्हाणे यांची ओळख केवळ एक माजी सरपंच, दूरदृष्टीचे सरपंच म्हणून आहेच तसेच एक संयमी, सुसंस्कृत आणि ध्येयवादी नेतृत्व म्हणून आहे. ज्या गावाने वर्षानुवर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपली आणि जिथल्या स्वाभिमानी शेतकऱ्यांनी इंचभर जमीनही विकली नाही, त्या डिंग्रजवाडीची ही ‘वज्रमुठ’ आज दिपाली गव्हाणे यांच्या पाठीशी डोंगरासारखी उभी राहिली आहे. तरुणांना व्यवसायाची गोडी लावून त्यांना उद्योजक बनवणारा आणि त्यांच्या अडचणीच्या वेळी जिवाचे रान करणारा हा ‘माणुसकीचा माणूस’ जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरला, तेव्हा गावाने कृतज्ञतेपोटी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
भोजनावळींच्या थाटाला ‘कांदा-भाकरी’ची मात! : निवडणुकीच्या काळात जिथे उमेदवारांच्या गोड , तिखटाच्या पंगती उठतात, तिथे डिंग्रजवाडीचे चित्र काळजाला भिडणारे आहे. येथील ग्रामस्थ सकाळीच आपल्या घरचा डबा घेऊन बाहेर पडतात. दुपारी एखाद्या पाहुण्याकडे, मित्राकडे किंवा बांधावरच्या झाडाच्या सावलीत बसून घरची शिदोरी, ‘कांदा-भाकरी’, ‘मिरचीचा ठेचा’ आणि चवीला ‘भेळ’ खात या निष्ठेच्या प्रचाराचा लोकोत्सव रंगतो. “आमची निष्ठा विकत घेणं कुणाच्याच बापाची पेंड नाही,” अशा परखड शब्दांत इथला तरुण आणि वृद्ध आपला स्वाभिमान व्यक्त करत आहे.

हृदयात माणुसकी, मनात विकासाचा ‘संकल्पनामा’ : दिपाली राहुल गव्हाणे या मतदार राजाला केवळ उमेदवार म्हणून नाही, तर घरातील सून आणि लेक म्हणून भावत आहेत. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि विकासाच्या स्पष्ट संकल्पामुळे जनमानसात त्यांची एक आगळीवेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. डिंग्रजवाडीच्या आया-बहिणी, तरुण आणि वृद्ध मंडळी आज कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर ‘सहकारी’ आणि ‘कुटुंबीय’ म्हणून घराघरात पोहोचत आहेत. घराघरातून येणारा आशीर्वाद आणि डोळ्यांतील विश्वास हीच या दांपत्याची सर्वात मोठी श्रीमंती ठरत आहे.
