पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी – पती राहुल गई

Swarajyatimesnews

शस्त्रक्रियेदरम्यान, पत्नीची प्रकृती गंभीर झाली तर मला सांगितले का नाही, मला भेटू का दिले नाही, तीच्यावरील नेमक्या उपचारांची माहिती का दिली नाही.

शिरूर – पूजा राहुल गई (वय-२८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांचा हाताच्या कोपरावर शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांचे पती राहुल देवीदास गई यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आजपासून येथील तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. गई यांच्या अनेक नातेवाईकांसह ते काम करीत असलेल्या रांजणगाव एमआयडीसीतील जाबील कंपनीतील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी दिवसभर आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शविला.

सहा ऑगस्ट ला येथील कोळपे हॉस्पिटल मध्ये पूजा गई यांचा हातावरील शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाला होता. याबाबत राहुल गई यांनी खबर दिली असून शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मूळचे दादुलगाव (ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) येथे राहणारे राहुल सध्या रांजणगाव येथील शेळकेवस्ती येथे वास्तव्यास असून, रांजणगाव एमआयडीसीतील खासगी कंपनीत सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, चार ऑगस्ट ला ते आपला मुलगा प्रणव (वय-६) आजारी असल्याने त्याला उपचारासाठी येथील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये पत्नी पूजा यांच्यासह दूचाकीवरून आले होते. उपचारानंतर परत रांजणगाव येथे जात असताना शिरूर बायपासवरील एका इलेक्ट्रिकच्या दुकानात दुरूस्तीसाठी दिलेले मसाज मशिन घेण्यासाठी ते थांबले. रस्त्याकडेला दूचाकी लावून ते दुकानात गेले. त्यावेळी मुलगा प्रणव हा देखील त्यांच्यामागे पळाल्याने त्याला घेण्यासाठी पूजा देखील त्याच्यामागे गेल्या.

त्यावेळी तेथील खडीवरून घसरून त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराला जखम झाली. त्यावेळी राहुल यांनी त्यांना तातडीने समोरच असलेल्या कोळपे हॉस्पिटल मध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून, एक्स रे काढून हाताला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले व शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने दुसऱ्या दिवशी बोलावले. त्यानूसार पाच ऑगस्टला दुपारी पूजा यांना कोळपे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक तपासण्यानंतर दुसऱ्या दिवशी (सहा ऑगस्ट) सकाळी ११ वाजता शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

या प्रक्रियेदरम्यान, हॉस्पिटलची, तेथील डॉक्टरांची, कर्मचारी वर्गाची भूमिका संशयास्पद होती, असा आरोप राहुल गई यांनी केला. शस्त्रक्रियेदरम्यान, अनेकदा डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांना अनेकदा विचारणा करूनही कुणीही समाधानकारक बोलले नसल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या पत्नीला पूर्वीचा कोणताही आजार नसताना, शस्त्रक्रियेदरम्यान रक्तदाब कमी झाल्याने मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.

शस्त्रक्रियेदरम्यान, पत्नीची प्रकृती गंभीर झाली तर मला सांगितले का नाही, मला भेटू का दिले नाही, तीच्यावरील नेमक्या उपचारांची माहिती का दिली नाही, असे सवाल त्यांनी केले. या सर्व प्रकरणातील डॉक्टरांची भूमिका संशयास्पद असून, त्यांची सखोल चौकशी करावी. ससून रूग्णालयात झालेल्या शवविच्छेदनाचा अहवाल लवकर प्राप्त व्हावा व त्याआधारे पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

दरम्यान, पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी राहुल गई यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. पूजा यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राहुल गई यांचा सहा वर्षांचा मुलगा प्रणव याला नेफ्रॉटीक सिन्ड्रोम नावाचा किडनीचा विकार असून, त्याच्यावर नियमीत उपचार चालू आहेत. त्याची आई पूजा या त्याला किडनी देणार होत्या. राहुल हे खासगी कंपनीत काम करीत असल्याने तुटपूंज्या पगारात संसार व मुलावरील उपचाराचा भार सांभाळताना त्यांची कसरत होत होती. म्हणून पूजा या देखील शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावीत होत्या. आता सारेच संपले, माझा संसार उध्वस्त झाला, अशी हताश प्रतिक्रिया राहुल गई यांनी व्यक्त केली. मी नोकरी करू की मुलाला सांभाळू अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!