उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहून जिंकली मने!
स्वराज्य टाइम्स न्यूज सेवा
वाघोली (ता.हवेली) “कुस्ती ही महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता आहे आणि याच परंपरेने देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. मल्ल हा केवळ शक्तीचा नव्हे, तर शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रतीक असतो. स्पर्धेच्या आखाड्यात आपल्या कर्तृत्वाने राज्याचे नाव उज्ज्वल करा,” असे प्रेरणादायी प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
पालकमंत्र्यांची शिस्त; महापौरांचा विलंब! - या सोहळ्याची विशेष चर्चा रंगली ती वेळेच्या पालनावरून. पालकमंत्री सुनेत्रा पवार या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधीच मैदानावर उपस्थित होत्या. मात्र, दुसरीकडे पाच वर्षांनंतर शहराला मिळालेल्या महापौर मंजुषा नागपुरे या तब्बल ४५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. पालकमंत्र्यांची ‘ऑन ड्युटी’ शिस्त आणि महापौरांचा विलंब यावरून कुस्ती शौकिनांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
’दादां’च्या कुस्तीप्रेमाची आठवण – सुनेत्रा पवार यांनी यावेळी अजितदादा पवारांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले. “दादांचे कुस्तीवर विशेष प्रेम असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. क्रीडा विभागाला सुगीचे दिवस आणण्याचे काम त्यांनी केले,” असे त्या म्हणाल्या.

मातृशक्तीला मानवंदना आणि स्वतंत्र गॅलरी – आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी यावेळच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. महिलांना कुस्तीचा आनंद घेता यावा यासाठी यंदा स्वतंत्र ‘महिला गॅलरी’ची व्यवस्था करण्यात आली आहे. “कुस्तीला केवळ खेळ न ठेवता त्याला ग्लॅमर मिळावे आणि नवीन पिढीतील महिलांनीही याकडे वळावे, हा यामागचा मुख्य हेतू आहे,” असे रामकृष्ण सातव यांनी नमूद केले.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके, आमदार ज्ञानेश्वर कटके, प्रदीप कंद, मोनिका मोहोळ, प्रियांका सातव, ऑलिम्पियन मारुती आडकर आणि अनेक माजी महाराष्ट्र केसरी विजेते उपस्थित होते. यावेळी खेळाडू साक्षी इंगळे हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
