पुणे–नगर महामार्गालगत वेगाने विस्तारत असलेल्या पेरणे फाटा–वढू खुर्द परिसरातील कुबेर पार्क येथील रहिवाशांचा अनेक दिवसांचा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. युवा नेते पै. किरण साकोरे यांच्या पुढाकारातून या अंतर्गत रस्त्याचे स्वखर्चाने मुरुमीकरण पूर्ण झाल्याने सुमारे ५०० हून अधिक नागरिकांना दिलासा मिळाला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
कुबेर पार्क परिसरात मोठी लोकवस्ती असून, या वस्तीला जोडणारा मुख्य रस्ता दीर्घकाळ पूर्णपणे उखडलेला होता. पावसाळ्यात चिखल तर इतर काळात धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे अवघड झाले होते. आरोग्याच्या आणीबाणीच्या वेळी रिक्षा किंवा रुग्णवाहिका येण्यासही अडथळे निर्माण होत होते.
ही बाब किरण साकोरे यांच्या निदर्शनास येताच, कोणताही विलंब न करता त्यांनी यंत्रणा कार्यान्वित केली. आवश्यक मुरूम टाकून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आणि नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुकर झाला.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यात किरण साकोरे यांनी जनसेवेचे कार्य उभे केले आहे. “निवडणुका नव्हे, तर नागरिकांचे रोजचे प्रश्न सोडवणे हेच खरे राजकारण,” हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवताना दिसत आहे. लाल मातीच्या कुस्तीच्या मैदानातून आलेल्या साकोरे यांनी सामाजिक बांधिलकी आणि कृतीशील नेतृत्वाचा ठसा उमटवला असल्याची चर्चा परिसरात आहे.
“आमच्या वस्तीतील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. रात्री-अपरात्री ये-जा करताना भीती वाटायची. किरण साकोरे यांनी ही अडचण समजून घेत रस्ता सुस्थितीत करून दिला. त्यांच्या कामामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला असून आम्ही त्यांचे आभारी आहोत.” — स्थानिक रहिवासी, कुबेर पार्क
सर्वांगीण कार्याचा ठसा : रस्ते दुरुस्तीपुरते मर्यादित न राहता किरण साकोरे यांनी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अयोध्या–काशी देवदर्शन यात्रा, नागपूर येथील चैत्यभूमी अभिवादन यात्रा अशा उपक्रमांतून त्यांची सामाजिक जाण अधोरेखित होते. ‘साकोरे पॅटर्न’ म्हणून ओळखली जाणारी ही कार्यपद्धती आता हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात परिचित होत आहे.
कुबेर पार्कमधील या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवासही सुकर झाला आहे. ग्रामस्थांनी या ‘लाल मातीच्या पैलवानाचे’ मनापासून आभार मानले आहेत.
