४३ जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
सणसवाडी (ता. शिरूर) : मागील ४६ वर्षांपासून सामाजिक बांधीलकी जपत ‘सीएसआर’ (CSR) अंतर्गत विविध उपक्रम राबविणाऱ्या पॉलीबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भव्य नेत्रतपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात २९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून गरजू रुग्णांना पुढील उपचारांची मदत देण्यात आली आहे.
शिबिराचा लाभ आणि चष्मे वाटप : २१ डिसेंबर २०२५ रोजी सणसवाडी येथे आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये ४३ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून, त्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच, दृष्टीदोष असलेल्या ७५ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

४६ वर्षांची सेवा परंपरा : पॉलीबॉन्ड इंडियातर्फे केवळ आरोग्यच नव्हे, तर शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातही मोठे योगदान दिले जाते. शाळांसाठी बेंच, वर्गखोल्या, संगणक पुरवणे, महिला व मुलींसाठी सॅनिटरी पॅड्सचे वाटप, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम संस्था सातत्याने राबवते. तसेच, वारी आणि १ जानेवारीच्या विजयस्तंभ बंदोबस्तासाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्थाही संस्थेमार्फत केली जाते.
या उपक्रमासाठी पॉलीबॉन्ड इंडिया व्यवस्थापनाचे जनरल मॅनेजर प्रीती वर्मा, जनरल मॅनेजर निलेश पाटील, विभाग व्यवस्थापक विशाखा केसरे, सीनियर मॅनेजर शरद राऊत आणि आदेश वीर उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी नेहा जोशी, सचिन शिर्के, समीक्षा राजस, सोनाली धुमाळ यांच्यासह राकेश गार्लेपाटी व इतर ३० हून अधिक स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे सणसवाडी आणि परिसरातील नागरिकांनी पॉलीबॉन्ड इंडियाच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

