पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना जलद आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वारीत एका मिनिटात ३२ ते ३५ वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी घुसखोरीच्या ठिकाणांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
यावर्षी जवळपास २२ ते २४ लाख वारकरी पंढरपुरात येण्याचा अंदाज आहे. वारकऱ्यांना कळसदर्शन आणि मुखदर्शन सहज घेता येते, मात्र पदस्पर्श दर्शनासाठी काटेकोर नियोजनाची गरज असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियोजन – वारीदरम्यान उद्भवू शकणाऱ्या चेंगराचेंगरी, पाण्यात वाहून जाणे, शॉर्ट सर्किट किंवा गॅसचा भडका यांसारख्या आपत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठीही प्रशासनाने तयारी केली आहे. चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असलेले १३ हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले असून, त्या ठिकाणी प्रत्येकी २२ जणांचे पथक तैनात केले जाणार आहे.
चंद्रभागा नदीत होड्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी होडी चालकांची माहिती, होडींचे फिटनेस सर्टिफिकेट आणि एका होडीत २० प्रवासी असतील याची खात्री केली जात आहे. यासाठी १५० वायरलेस फोन उपलब्ध करण्यात आले आहेत. पंढरपुरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बस स्थानक परिसरात नियंत्रण कक्ष (कंट्रोल युनिट) उभारण्यात येणार असून, तेथे ५५ इंची एलईडी स्क्रीन आणि जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
पावसाळ्यातील वारीसाठी विशेष तयारी- गेल्या वर्षी अंदाजे १८ ते २२ लाख वारकरी आले होते, तर यंदा २२ ते २४ लाख वारकरी येण्याची शक्यता आहे. यावर्षी वारीदरम्यान जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. गेल्या वर्षी ३० हजार घनमीटरचे मुरुमीकरण झाले होते, यंदा ते ७४ हजार घनमीटर करण्यात आले आहे.
मंडपांच्या बाबतीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ३ लाख १५ हजार चौरस फुटांचा मंडप होता, तर यावर्षी ७ लाख १२ हजार चौरस फुटांचा मंडप असणार आहे. यात ९ ठिकाणी जर्मन हँगर मंडप आणि ९४ ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप असतील. प्रत्येक साडेतीन किलोमीटरवर वॉटरप्रूफ मंडप उपलब्ध करून दिला जाईल.
अशी असणार सुविधा – रुग्णवाहिका२८,फिल्ड आयसीयू ५ बेडची २१ ठिकाणी सुविधा, वारकऱ्यांसाठी जलस्रोत ८३७,टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी फिडिंग पॉइंट११५,फिरते स्वच्छतागृह६ हजार २५०,कायमस्वरूपी स्वच्छतागृह ४ हजार ५२०, मोबाईल चार्जिंग व्हॅन५ (एकावेळी १०० मोबाईल चार्जिंगची सोय),दूरध्वनी करण्यासाठी सेंटर २०,दिंडीप्रमुखांना दिलेले मेडिकल किट्स४ हजार ५००,महिलांसाठी स्नानगृह २ हजार १००