शिरूर तालुक्यातील शेतकरी पुत्र प्रथमेश मलगुंडेची पहिल्याच प्रयत्नात ‘इंडियन नेव्ही’त सब लेफ्टनंट पदी निवड

Swarajyatimesnews

ढोक सांगवी (ता.शिरूर) येथील शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण शाळेतून मिळालेले शिक्षण आणि मनात देशसेवेची जिद्द आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विचाराची प्रेरणा या त्रिसूत्रीच्या बळावर शिरूर तालुक्याच्या प्रथमेश मलगुंडेने पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौदलात (Indian Navy) ‘सब लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली आहे! हे यश केवळ प्रथमेशचे नाही, तर ग्रामीण भागातील संघर्ष करत स्वतःल सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक नवा आशेचा किरण आहे.

भोर तालुक्यातील जिजामाता विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रथमेश मलगुंडे याने  इंडियन नेव्हीच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक्निकल – SSC Tech)* परीक्षेत हे देदीप्यमान यश संपादन केले आहे.

शिवाजी महाराजांकडून मिळाली देशसेवेची प्रेरणा: प्रथमेशचे प्राथमिक शिक्षण भोर तालुक्यातील जिजामाता विद्यालयात झाले. तो चौथीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून त्याच्या मनात देशसेवेची ठिणगी पडली. पुढे आठवीत असताना कराटेचे प्रशिक्षण घेऊन त्याने आत्मविश्वास दुणावला. हीच प्रेरणा त्याला भविष्यात संरक्षण दलात जाण्यासाठी दिशादर्शक ठरली.

उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञानातील चमकदार कामगिरी: बारावीनंतर प्रथमेशने पुण्याच्या ए.आय.एस.एस.एम.एस. (AISSMS) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना तो केवळ पुस्तकी किडा राहिला नाही, तर त्याने विविध तांत्रिक क्लब्समध्ये आणि प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः, ‘रीव्ह’ (REEV – Range Extended Electric Vehicle) या प्रकल्पात त्याच्या टीमने २०२३ मध्ये अखिल भारतीय स्तरावर पहिले स्थान पटकावले. याशिवाय, गो-कार्ट रेसमध्ये २०२१ मध्ये दुसऱ्या स्थानावर बाजी मारली. त्याने ‘ई-बायसिकल विथ पेडल चार्जिंग’ या विषयावर ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स’ येथे शोधपत्र सादर केले, तर ‘आय.ई.टी.ई.’ (Institute of Electronics and Telecommunication Engineers) मध्ये डिझाईनिंगवर महत्त्वाचा पेपर प्रकाशित केला.

एस.एस.बी. (SSB) परीक्षेतील विजयी झेप: २०२४ मध्ये ‘इंडियन नेव्ही एस.एस.सी. टेक’ (Indian Navy SSC Tech) साठी भरती जाहीर झाली आणि प्रथमेशने संधी साधत अर्ज दाखल केला. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याला कोलकाता येथील एस.एस.बी. (सर्विसेस सिलेक्शन बोर्ड) साठी बोलावणे आले.

 त्याने २० ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान एस.एस.बी. मुलाखत दिली. लेखी परीक्षा, मुलाखत आणि शारीरिक चाचणीसह सर्व टप्पे यशस्वीरित्या पार करत त्याची ‘सब लेफ्टनंट’ पदावर निवड निश्चित झाली. यानंतर वैद्यकीय चाचणी पूर्ण करून, अखेर २८ मे २०२५ रोजी जाहीर झालेल्या अंतिम मेरिट लिस्टमध्ये त्याचे नाव झळकले आणि भारतीय नौदलाकडून त्याला गौरवशाली ‘जॉइनिंग लेटर’ (Joining Letter) प्राप्त झाले.

कुटुंबाचा त्याग, यशाचा आधारस्तंभ: प्रथमेशचे वडील प्रकाश भवन, पुणे येथे एम.एस.ई.बी. (MSEB) मध्ये कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहेत. प्रथमेशच्या या प्रवासात त्यांच्या आई-वडिलांचा भावनिक पाठिंबा आणि अथक त्याग हाच यशाचा खरा आधारस्तंभ ठरला आहे.

 आज प्रथमेश मलगुंडेने ग्रामीण भागातील युवकांसाठी एक नवा मार्ग दाखवला आहे. त्याने सिद्ध केले आहे की, कोणत्याही परिस्थितीतून आलेल्या तरुणाकडे जिद्द, आत्मविश्वास आणि देशसेवेची तीव्र इच्छा असेल, तर तो कोणतीही मोठी स्वप्ने सहज साकार करू शकतो. प्रथमेशच्या या यशाबद्दल त्याचे, त्याच्या कुटुंबाचे समाजातील विविध स्तरातून. अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!