शिरूर-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात निमोणे येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूl

Swarajyatimesews

शिरूर: तालुक्यातील शिरूर-न्हावरे रस्त्यावरील नलगे वस्ती परिसरात शुक्रवारी मध्यरात्री कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात नऊ वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा आणि मामाचा समावेश असून, कुटुंबातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे निमोणे गावावर शोककळा पसरली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निमोणे येथील पवन राजहंस काळे (वय ३८), त्यांची पत्नी वंदना काळे, मुलगी आराध्या काळे (वय ९) आणि मेहुणे बाळासाहेब प्रकाश नागवडे (वय ३८) हे सर्वजण कोल्हापूर येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून आपल्या खासगी कारने गावी परतत असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नलगे वस्ती परिसरात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मध्यरात्रीच्या शांततेत झालेल्या या भीषण आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

या दुर्घटनेत पवन काळे, त्यांची मुलगी आराध्या आणि बाळासाहेब नागवडे यांचा जागीच मृत्यू झाला. वंदना काळे या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. एकाच घरातील तीन व्यक्तींचा असा अचानक अंत झाल्याने संपूर्ण शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, शिरूर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!