धक्कादायक ! कोरेगाव भीमा येथे परप्रांतीय तरुणाचा निर्घृण खून

Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) :पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात एका परप्रांतीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुळीक प्रॉपर्टीजवळ बुधवार दिनांक १० फेब्रुवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सुकेन महातो (रा. ओडिशा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या मुळीक प्रॉपर्टीच्या परिसरात एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, सुकेन महातो याच्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही हत्या इतक्या क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे की, परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. तसेच शिरूर येथील फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

 “आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस प्रशासन आरोपीचा कसून शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली.

हवालदार नवनाथ नाईकरे, गणेश कुदळे, श्रावण गुपचे, अमोल दांडगे, विकास पाटील आणि अमोल नलगे यांचे पथक तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढत आहे.”

मयत सुकेन महातो हा मूळचा ओडिशाचा रहिवासी असून तो कामाच्या निमित्ताने या परिसरात वास्तव्यास होता. त्याचा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदतही घेतली जात असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!