लोणीकंद (ता. हवेली): निवडणुकीतील जय-पराजय तांत्रिक असतो, पण लोकांच्या मनातील स्थान महत्त्वाचे असते. प्रदीप कंद यांनी गेली १५ वर्षे पद नसतानाही लोणीकंद-पेरणे परिसरासाठी मोठे काम केले आहे. या जनभावनेचा आदर करून, त्यांना जिल्हा नियोजन समिती किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन्मानाचे पद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही आमदार माऊली कटके यांनी दिली.
लोणीकंद येथे आयोजित आभार मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, या भागाला ‘दुप्पट निधी’ देण्याचेही जाहीर केले.
दुप्पट निधी देऊन न्याय देऊ : आमदार माऊली कटके म्हणाले की, “अजितदादांच्या आकस्मिक जाण्याने आपण एका मोठ्या नेतृत्वाला मुकलो, ज्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. मात्र, आता खचून न जाता लढण्याची वेळ आहे. या गटात धनशक्तीचा वापर करून जनशक्ती दडपण्याचा प्रयत्न झाला असला, तरी विकासकामांत आम्ही मागे हटणार नाही. जिल्हा परिषद सदस्याला मिळतो त्यापेक्षा दुप्पट निधी या १२ गावांना मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल. शिरूर-हवेलीत सर्वाधिक निधी लोणीकंद गटाला दिला जाईल.

भाऊ असावा तर असा! : व्यासपीठावर प्रदीप वसंत कंद आणि राकेश कंद यांच्यातील बंधुत्वाचा उल्लेख करताना आमदार कटके भावूक झाले. “भाऊ असावा तर राकेश कंद यांच्यासारखा, जो प्रत्येक संघर्षात सावलीसारखा सोबत राहतो. अशा निष्ठवान कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. प्रदीप भाऊंचे पुनर्वसन हा केवळ पक्षाचा निर्णय नसून, ती इथल्या जनतेच्या भावनांची गरज आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

रडणार नाही, लढणार – प्रदिप वसंत कंद यावेळी बोलताना प्रदीप वसंत कंद यांनी पराभवाचे दुःख बाजूला सारून पुन्हा कामाला लागण्याचे संकेत दिले. “हा पराभव जिव्हारी लागला आहे, पण १२ हजार २०० मतदारांनी दाखवलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. माझ्या मुलीला ‘बाबा जिंकला’ हे सांगता आले नसले, तरी ‘बाबा लोकांसाठी स्वाभिमानाने लढतोय’ हे मी अभिमानाने सांगेन. एमआयडीसी असो वा स्थानिक प्रश्न, आम्ही कोणाच्या पोटावर पाय देऊ देणार नाही. माऊली आबांसारखा मोठा भाऊ माझ्या पाठीशी उभा आहे, हेच माझे भाग्य आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या मेळाव्याला पेरणे, लोणीकंद आणि परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. “अजितदादांनी निवडलेला माणूस कामाचाच असतो, पण धनशक्तीमुळे आमचा पराभव झाला. आता आमदारांनी भाऊंना स्वीकृत सदस्य करून न्याय द्यावा,” अशी मागणी महिला आणि ग्रामस्थांनी एकमुखाने केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनीही संघटनेच्या वतीने प्रदीप वसंत कंद यांना योग्य न्याय दिला जाईल, असे स्पष्ट केले.
