कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील सुपुत्र आणि गावचे आदर्श अधिकारी अरविंद गोकुळे यांची अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या कार्यतत्परतेने प्रशंसनीय सेवा बजावली असून, गावातील तरुणांसाठी ते नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कष्टाळू मुलाने घेतलेली ही नेत्रदीपक भरारी गावासाठी गौरवाची बाब ठरली आहे. पोलिस खात्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक मिळवणारे अरविंद गोकुळे यांचा कोरेगाव भिमा ग्रामस्थांनी सत्कार करत अभिमान व्यक्त केला.

सरस्वती गोकुळे आणि गोकुळे या शिक्षक दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या अरविंद गोकुळे यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून पोलिस उपनिरीक्षक म्हणून आपल्या सेला सुरुवात केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपअधीक्षक पदांवर काम करत त्यांनी प्रशासनात आपली छाप सोडली. आता निवृत्तीला अवघे दहा दिवस शिल्लक असताना अप्पर पोलिस अधीक्षक पदावर त्यांनी भरारी घेतल्याने ग्रामस्थांचा अभिमान दुणावला आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ (पि.के.) गव्हाणे, सरपंच संदीप ढेरंगे, माजी उपसरपंच राजेंद्र ढेरंगे, ग्राहक समितीचे भानुदास सरडे, राजेंद्र गव्हाणे, शंकर गव्हाणे, शिरीष देशमुख, प्रकाश वाबळे, पुंडे, सुधाकर ढेरंगे, प्रा. बाबासाहेब गव्हाणे, नितीन गव्हाणे, देविदास गव्हाणे, बन्सी वाडेकर, प्रदीप खलसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अरविंद गोकुळे हे केवळ एक अधिकारी नसून, कोरेगाव भीमाच्या तरुणांसाठी ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. स्पर्धा परीक्षेतील मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळे अनेक तरुणांचे जीवन घडवण्याचे काम त्यांनी केले आहे. शिक्षक असलेल्या त्यांच्या आई-वडिलांनी गावातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आणि अरविंद गोकुळे यांनी त्याच मूल्यांचा वारसा पुढे नेला. राष्ट्रीय स्तरावर गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या भूमिपुत्राचा कोरेगाव भिमा ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. – पंढरीनाथ (पि.के.) गव्हाणे,माजी पंचायत समिती सदस्य