कोरेगाव भिमा (ता. शिरूर) — छट पूजा म्हणजे सूर्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम असून एकतेतच देवत्व आहे,असे प्रतिपादन करत माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांनी उत्तर भारतीय बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
भिमा नदीकिनारी जन कल्याण ट्रस्टच्या माध्यमातून पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि बंधुभावाचा संगम असलेली छट पूजा यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. या पवित्र सोहळ्यास कुसुम आबाराजे मांढरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून भाविकांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, शिवसेनेचे अनिल काशिद, माजी सरपंच रामभाऊ सासवडे ,भाजपचे संपत गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, नितीन गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्या मनीषा गव्हाणे,यावेळी अध्यक्ष व अयोजक सुरेश कुमार सिंह, छठ पूजा अध्यक्ष विकास सिंह व भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“छट पूजा ही निसर्ग, सूर्य आणि मातृत्वाचा उत्सव आहे. सूर्यदेवाच्या आराधनेतून आपण जीवनातील प्रकाश आणि सकारात्मकतेचा स्वीकार करतो. या सणात समाजातील बंधुभाव आणि एकतेचा सशक्त संदेश दडलेला आहे. ‘एकतेतच देवत्व आहे’ हा संदेश या उत्सवातून प्रत्येकापर्यंत पोहोचतो. छट मातेच्या कृपेने सर्वांना सुख, आरोग्य आणि समृद्धी लाभो.” – कुसुम आबाराजे मांढरे, माजी जिल्हा परिषद सदस्या
कुसुम मांढरे यांच्या या भावनिक व प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित भाविकांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण केली. त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाचे वातावरण अधिक उर्जावान झाले. उत्तर भारतीय बांधवांनी “छठी माई की जय” या जयघोषांनी परिसर दुमदुमवला.
सोमवारी (दि. २७) सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यात आले, तर मंगळवारी (दि. २८) पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन व्रताची सांगता करण्यात आली. पावसाच्या हलक्या सरी असूनही महिलांनी श्रद्धाभावाने नदीपात्रात कमरेपर्यंत उभे राहून दुध व जलाचे अर्घ्य अर्पण केले. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जण कल्याण ट्रस्टचे पदाधिकारी, स्थानिक युवक आणि ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले. या वेळी कोरेगाव भिमाचे आदर्श सरपंच संदीप ढेरंगे विशेष उपस्थित होते.

भिमा नदीकाठचे हे दृश्य भक्ती, सौहार्द आणि संस्कृतीचा जिवंत प्रतीक ठरले. कुसुम आबाराजे मांढरे यांच्या उपस्थितीमुळे उत्तर भारतीय बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि छट पूजेच्या माध्यमातून एकतेचा संदेश प्रत्येकाच्या हृदयात झळकला.
छटपूजे दरम्यान पावसाच्या सरी – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरी आज सायंकाळी पाच साडेपाच वाजताच्या दरम्यान ढगाळ वातावरण व अंशी पावसाच्या सरी पडल्यामुळे महिलांची तारांबळ उडाली होती. मात्र आपल्या पूजेची सुरक्षा ठेवण्यासाठी व दिवा विजू नये याकरिता काहींनी छत्रीचा आधार घेत पूजा पूर्ण केली.
छटपूजा सणाविषयी माहिती – छटपूजा हा प्रामुख्याने सूर्यदेव आणि त्यांची बहीण षष्ठी मैया (छठी मैया) यांना समर्पित असलेला प्राचीन हिंदू उत्सव आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो, म्हणून याला ‘सूर्य षष्ठी व्रत’ किंवा ‘छट पूजा’ असेही म्हणतात. हे व्रत विशेषतः सौभाग्य, समृद्धी आणि संतान प्राप्तीसाठी केले जाते. या व्रतामध्ये सूर्यदेवाच्या दोन्ही शक्ती – ऊषा (पहाटेची पहिली किरण) आणि प्रत्यूषा (संध्याकाळची शेवटची किरण) यांची एकत्रित आराधना केली जाते. स्वरूप: हे व्रत चार दिवस चालते आणि या दरम्यान व्रताचारी (उपवास करणारे) निर्जल उपवास करतात.
प्रसाद: या पूजेत प्रसादाची पवित्रता जपली जाते. गहू आणि गुळापासून तयार केलेला ठेकुआ हा प्रमुख प्रसाद असतो. या पूजेचा मुख्य विधी पवित्र जलाशयाच्या पाण्यात उभे राहून सूर्यदेवाला दुधाचे व जलाचे अर्घ्य देणे. या पूजेमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत श्रद्धेचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य (ऊषा अर्घ्य) देऊन व्रताची सांगता होईल.
