बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात एका १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना महाविद्यालयाच्या आवारात घडली असून, यामुळे विद्यार्थी, शिक्षक, आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. आज सकाळी अकराच्या सुमारास एका विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात हलवले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, आणखी एक जण या हल्ल्यात सहभागी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व संबंधित विद्यार्थी अल्पवयीन आहेत.
काही दिवसांपूर्वी पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून हे खूनाचे प्रकरण उफाळून आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सद्यस्थितीत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.