पुणे – आळंदीच्या मरकळ चौकात शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर (वय ५४) यांना भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. गाडीवर दंड आकारल्याचा राग मनात ठेवून विजय नामदेव जरे (वय ३३, रा. गोपाळपुरा, आळंदी) या व्यक्तीने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जरे याने वाडेकर यांना गाडीवर पावती का केली, असा जाब विचारत धमकी दिली. त्यानंतर वाडेकर यांच्या शर्टाची बटने तोडत, त्यांच्या गालावर चापट मारली आणि डोक्यावर व छातीवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. या घटनेमुळे मरकळ चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.आळंदी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.