शिक्रापूर (ता. शिरूर): शिक्रापूर येथील शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय यंदा पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गावचे आदर्श सरपंच रमेश गडदे आणि ग्रामपंचायत सदस्य शालन राऊत, उद्योजक प्रीतम राऊत व इतर सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांनी स्वखर्चातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सदस्यत्व दिले आहे, ज्यामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी लागणारी ओळखपत्रे आणि अर्ज याचा सर्व खर्च या पदाधिकाऱ्यांनी स्वतः उचलला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण होईल, अशी आशा सरपंच गडदे आणि सदस्य राऊत यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय थिटे आणि ज्योती जकाते यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या उपक्रमामुळे ग्रामविकासात वाचनालयाची भूमिका अधिक प्रभावी होईल, असे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे यांनी म्हटले आहे.
या वाचनालयाला लोकप्रिय करण्यात ग्रंथपाल संतोष काळे यांचे कुशल व्यवस्थापन महत्त्वपूर्ण ठरले आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार विजेते संतोष काळे यांनी या कार्यक्रमात वाचनालयाची माहिती दिली आणि सभासद दाता,वाचक व उपस्थितांचे आभार मानले.