टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आणि विद्यार्थीहितासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे शिरूर तालुक्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचवणारे टाकळी हाजी गावचे सुपुत्र दत्तात्रय अनंतराव चिकटे गुरुजी यांची “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणे येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले चिकटे गुरुजी त्यांच्या प्रामाणिक परिश्रमासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखले जातात. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, बारामती आणि लातूर सायन्स अकॅडमी यांच्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. यावर्षी महाराष्ट्रातील शिक्षकांमधून चिकटे गुरुजी यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चिकटे गुरुजींना हा गौरव प्रदान केला जाईल.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत चिकटे गुरुजींनी केवळ अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित न करता, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि उपक्रमशीलता रुजवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांचे हे कार्य समाजासाठी एक आदर्श बनले आहे. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
चिकटे गुरुजींच्या या यशाबद्दल त्यांचे मित्र परिवार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेषतः, गुरुकुल प्राथमिक शिक्षक संघ, टाकळी हाजी यांनी त्यांच्या निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांचा हा सन्मान केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण शिरूर तालुका आणि पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.