राजाराम गायकवाड
शिक्रापूर (ता. शिरूर ) छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी राज्याची स्थापना केली, तो काळ सोयीचा नव्हता, तर तो अत्यंत प्रतिकूल होता. या प्रतिकूलतेवर मात करत महाराजांनी स्वराज्य घडवले, असे प्रतिपादन ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले.
कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी, काल्याचे कीर्तन करताना महाराज बोलत होते. यावेळी कोंढापुरी, कवठीमळा, खंडाळे, शिक्रापूर, निमगाव म्हाळुंगी, कासारी, रणसिंगमळा, बुरूंजवाडी या गावांसह परिसरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
आई आणि बापाची महती – कीर्तनात महाराज म्हणाले, “नव्या युगाचे निर्माते, कुशल संघटक, आदर्श पुत्र, लढवय्ये आणि सज्जनांचे कैवारी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते.”
यावेळी त्यांनी आई-वडिलांच्या नात्याची महती सांगितली. ‘आई होण्याला किंवा आई असण्याला किंमत कोणामुळे आहे? त्या कॅरेक्टरचे नाव आहे बाप. हा बाप कधी कोणी पाहिला नाही, वाचला नाही किंवा ऐकला नाही. आई म्हणजे अश्रूंचा घाट, तर बाप म्हणजे संयमाचा घाट,’ असे सांगून त्यांनी श्रोत्यांना भावूक केले.
संसार आणि परमार्थ – नामस्मरणाचे महत्त्व सांगताना महाराज म्हणाले, “प्रपंचात सुख नाही, ते कधीच मिळणार नाही, कारण हा संसार वांझोटा आहे. तो फळ लागल्यानंतरच सुखाचा होईल. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची सेवा केली तरच सुख मिळते. आपण सुद्धा भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे आणि साधुसंतांच्या सहवासात राहिले पाहिजे.”
यावेळी बारामती येथील ह.भ.प. भरतमहाराज शिंदे यांनीही आपले विचार मांडले. “कुठल्याच संताने संसार सोडून परमार्थ करा असे सांगितले नाही. माणसाला मिळालेले ज्ञान जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी आहे,” असे ते म्हणाले.या हरिनाम सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी सोपानराव गाडगे, दत्तात्रय गायकवाड, गुलाबराव गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.