“मुले हीच देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. -आदर्श सरपंच रमेश गडदे
शिक्रापूर ( ता. शिरूर) कुमावत समाजातील समस्या, गरज आणि पुढील दिशा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुमावत विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी अलीकडेच पुणे जिल्ह्याचा दौरा केला. या भेटीला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दौऱ्याच्या निमित्ताने शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते प्रफुल्लचंद्र कुमावत यांना वह्या देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास साहित्यिक मनोहर परदेशी, मांडवगण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हर्षदा परदेशी, मनिषा कुमावत, महेश शिर्के, जितेंद्र काळोखे, दिनेश अमाप, बजरंग मुडे, रियाज शेख, सुनील सोनटक्के, आकाश अवसरमल आदी मान्यवर उपस्थित होते.
“शिक्षण हा समाज प्रगतीचा मूलाधार” – प्रफुल्लचंद्र कुमावत
यावेळी बोलताना कुमावत म्हणाले, “समाजातील युवक आणि विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले पाहिजे. भावी पिढी व्यसनापासून दूर राहून सक्षम आणि सजग नागरिक बनली तर समाजाची वाटचाल अधिक मजबूत होईल.”तसेच त्यांनी राज्यभर गावोगावी संघटना उभारण्याचा आणि मोठ्या प्रमाणात समाज मेळावे घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
“मुले हीच देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. भावी पिढी सुदृढ करण्यासाठी तरुणांना योग्य दिशा आणि संधी देणे अत्यावश्यक आहे.” – आदर्श सरपंच रमेश गडदे, शिक्रापूर
विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर साहित्य म्हणून कवी मनोहर परदेशी यांच्या वतीने वह्या आणि पेनचे वाटप करण्यात आले.
