धक्कादायक! प्रियांश अपार्टमेंटमध्ये भीषण स्फोट आणि आग; १९ वर्षीय युवकाचे संतापजनक कृत्य.

Swarajyatimesnews

पुण्यातील धानोरी (ता.हवेली) परिसरातील ‘प्रियांश अपार्टमेंट’ सोसायटीत पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोट आणि आगीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय युवकाने सोसायटीतील वाहने पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

​१३ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ‘प्रियांश अपार्टमेंट’च्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, गाढ झोपेत असलेले रहिवासी भीतीने घराबाहेर आले. पार्किंगमधून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट हवेत उडत असल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. जवानांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने तब्बल सहा वाहने जळून खाक झाली होती.

​या आगीत केवळ वाहनेच नव्हे, तर सोसायटीची वीज वाहिनी आणि इतर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने रहिवाशांना इमारतीबाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.​विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी तपासचक्र फिरवून विशाल राजेश खलसे (वय १९, रा. परांडेनगर, धानोरी) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तक्रारदार तरुणाशी असलेल्या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठीच त्याने ही वाहने पेटवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​विशालवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे धानोरी परिसरात भीतीचे वातावरण असून, सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.याप्रकरणी पोलिसांनी आग आणि स्फोटाच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, त्यात आणखी काही चौकशी व तपास होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!