राष्ट्रीय परिवर्तक परिषदेसाठी मंगेश पोळ यांची  निवड

Swarajyatimesnews

 माहेरच्या प्रेमाची आणि सेवेची गाथा

२५ सप्टेंबर, पुणे: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, सामाजिक शांतता आणि मानवतेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मंगेश पोळ याची गुजराथमधील राष्ट्रीय परिवर्तक परिषद २०२५ साठी निवड झाली आहे. भारतभरातील केवळ ५० निवडक व्यक्तींमध्ये मंगेशचा समावेश झाल्याने त्याचे हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.

आईने जीवावर उदार होऊन माहेर या संस्थेमध्ये दाखल केल्यामुळे मंगेशच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले. सिस्टर लुसी कुरियन यांनी स्थापन केलेल्या ‘माहेर’ संस्थेने मंगेशवर अपार प्रेम केले आणि याच प्रेमामुळे हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडत त्याच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. “प्रेम हा माझा धर्म आहे” हे ब्रीदवाक्य त्याने याच संस्थेमधून अंगिकारले.

आपल्या अतुलनीय कर्तृत्वासाठी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक मिळवल्यानंतरही मंगेश हुरळून गेला नाही. वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजसेवा महत्त्वाची मानणाऱ्या मंगेशने आपले कार्य पुढे चालू ठेवले. आज मंगेश एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पात जागतिक शांतता, मानवता आणि समानता यांचा प्रवक्ता म्हणून काम करत आहे. विविध धर्मांमध्ये सलोखा आणि ऐक्य निर्माण करण्यासाठी त्याचे सतत प्रयत्न सुरू आहेत.

‘जीवन खूप सुंदर आहे, चला ते अधिक सुंदर बनवूयात’ हे ब्रीदवाक्य घेऊन तो आजही अविरत कार्यरत आहे. मंगेशचे हे यश माहेर संस्थेने दिलेल्या संस्कारांचे आणि त्याच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!