पुणे जिल्हा परिषदेकडून केंदूर ग्रामपंचायतीचा सन्मान; क्षयरोगमुक्त गावाचा बहुमान

Swarajyatimesnews

केंद्रूर (ता. शिरूर) , २६ मार्च —पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने केंदूर ग्रामपंचायतीचा “क्षयरोगमुक्त गाव” म्हणून विशेष सन्मान करण्यात आला आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे केंदूरने गव्हाणे सन्मान मिळवलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात केंद्रूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) गाव म्हणून सन्मान करण्यात आला. सरपंच प्रमोद प-हाड, उपसरपंच शालन भोसुरे आणि ग्रामविकास अधिकारी सुनील दरेकर यांनी जिल्हा परिषद सभागृहात हा पुरस्कार स्विकारला.

केंद्रूर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून क्षयरोगाविषयी जनजागृती मोहीम राबवली. नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून दिले. या प्रयत्नांमुळे गावात क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून या कामगिरीसाठी गावाचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार स्विकारल्यानंतर सरपंच प्रमोद प-हाड यांनी यशाचे श्रेय संपूर्ण गावकऱ्यांना, आरोग्य विभागाच्या कर्मचारी-अधिका-यांना दिले. “भविष्यातही क्षयरोगमुक्त गाव ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी माजी सरपंच अमोल थिटे, सदस्य भरत साकोरे, अशोक भोसुरे, मदन प-हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले असून या गौरवामुळे केंदूर ग्रामपंचायतीने पुणे जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!