चिमुरड्याच्या रक्ताळलेल्या देहाला कवेत घेताना चालकाचेही हात थरथरले !
लोणी काळभोर (ता.हवेली) आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत ज्या अंगणात तो हसला, बागडला आणि ज्या मातीत त्याने स्वप्नांचे किल्ले रचले, त्याच मातीत नियतीने त्याच्या आयुष्याचा खेळ मांडला. लोणी काळभोर येथील एका सोसायटीच्या आवारात खेळताना पाच वर्षांच्या निष्कर्ष रेड्डी या चिमुरड्याचा गाडीखाली चिरडून अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेने केवळ रेड्डी कुटुंबाचा आधारच हिरावला नाही, तर संपूर्ण परिसराचे काळीज हेलावले आहे.
हसणं विरलं, काळजाचा तुकडा कायमचा मिटला! – पाच वर्षांचा निरागस निष्कर्ष नेहमीप्रमाणे सोसायटीच्या मोकळ्या आवारात खेळत होता. आपल्याच विश्वात रमलेला हा चिमुरडा खेळता-खेळता अचानक मागून येणाऱ्या कारच्या समोर आला. अवघ्या काही सेकंदांत कारचे चाक त्याच्या कोवळ्या अंगावरून गेले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. काही वेळापूर्वी ज्याच्या निरागस हसण्याने आसमंत दुमदुमत होता, तिथे आता फक्त सुन्न करणारी शांतता आणि आई-वडिलांचा हंबरडा उरला आहे.
तो व्हिडिओ पाहून डोळे पाणावले… या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चालक कवडे यांनी अपघात झाल्याचे लक्षात येताच धावत जाऊन निष्कर्षाला आपल्या हातांत उचलले. पण, त्या रक्ताळलेल्या देहात हालचाल उरली नव्हती. ज्या हातांनी त्याला खेळवायचे, त्याच हातांनी त्याला रक्ताळलेल्या अवस्थेत उचलताना उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच या चिमुरड्याची प्राणज्योत मालवली होती.
मनाला चटका लावणारी घटना अन् पाणावलेले डोळे – निष्कर्षच्या जाण्याने रेड्डी कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर शब्दात मांडण्यापलीकडे आहे. “बाळाला घराबाहेर सुरक्षित आहे म्हणून खेळायला सोडले, पण काळ तिथेच दबा धरून बसला असेल याची कल्पना नव्हती,” अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या आहेत. आता या अंगणात तो कधीच खेळायला येणार नाही, ही जाणीवच प्रत्येकाचे मन सुन्न करत आहे.
सोसायटीत ‘सुरक्षा’ फक्त नावापुरतीच? – रस्त्यावरील ट्रॅफिकला घाबरून पालक आपल्या पाल्यांना सोसायटीच्या आवारात खेळायला पाठवतात. मात्र, तेथेही वाहनांचा अविचाराने वाढलेला वेग आणि चालकांचा गाफीलपणा चिमुरड्यांच्या जीवावर बेतत आहे. निष्कर्षचा मृत्यू हा केवळ अपघात नसून, सुरक्षिततेच्या नावाखाली आपण किती बेसावध आहोत, याची चपराक देणारी ही वेदनादायक घटना आहे.
पालकांनो आणि चालकांनो… थोडं जपून! – सोसायटीच्या आवारात गाडी चालवताना आपला वेग नव्हे, तर लक्ष महत्त्वाचे आहे. लहान मुले उंचीने कमी असल्याने अनेकदा ती चालकाच्या नजरेस पडत नाहीत. आपल्या एका सेकंदाचा निष्काळजीपणा एखाद्या कुटुंबाचा ‘काळजाचा तुकडा’ हिरावू शकतो, याचे भान प्रत्येकाने ठेवणे हीच निष्कर्षला खरी श्रद्धांजली ठरेल.
