शैक्षणिक प्रगती व सामाजिक भान जपणारी नवनिर्वाचित माजी विद्यार्थी संघटना
वढू बुद्रुक (ता. शिरूर):श्री. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन महादेव भंडारे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गावात, विशेषतः शिक्षक व माजी विद्यार्थ्यांत समाधानाचे वातावरण दिसून आले. शांत, मनमिळाऊ, कष्टाळू आणि शैक्षणिक विकासासाठी सातत्याने धडपड करणारा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सचिन भंडारे हे अध्यक्षपदी निवडले जाणे म्हणजे माजी विद्यार्थी संघाच्या पुढील वाटचालीतील एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांना आधुनिक विचारांची दिशा देणे आणि मूल्याधिष्ठित शिक्षणास चालना देणे या बाबींचा प्राधान्यक्रम ठेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. शैक्षणिक सुविधा वाढवणे, शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्याची उपलब्धता याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
कार्यकारिणीची बिनविरोध निवड : कार्यकारिणीत अध्यक्षपदी सचिन महादेव भंडारे, उपाध्यक्षपदी विश्वास शिवले, सचिवपदी मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण सर, सहसचिवपदी तुषार रमेश भंडारे, कोषाध्यक्षपदी अनिल जनार्दन भंडारे, सहकोषाध्यक्षपदी नितीन अंकुश भंडारे, तर सल्लागार सदस्य म्हणून सोमनाथ भंडारे सर यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी उपक्रम : नवीन कार्यकारिणीने शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची तयारी दर्शविली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, विज्ञान प्रयोग, वक्तृत्व स्पर्धा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अशा पूरक उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचाही मानस संघाने व्यक्त केला.आदर्श शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यात सशक्त संवाद निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.
शाळा हे ज्ञानमंदिर आहे. सुसंस्कृत, जबाबदार आणि सक्षम नागरिक घडवण्याचे पवित्र कार्य या ठिकाणी घडते. विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढवणे, गुरुजनांचा सन्मान, आणि ग्रामीण भागातील आपल्या लहान भावंडांसाठी माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून निःस्वार्थपणे काम करणे हेच आमचे ध्येय असेल. – सचिन महादेव भंडारे, नवनिर्वाचित अध्यक्ष , माजी विद्यार्थी संघटना

शेतकरी पुत्र ते उद्योजक वाटचाल करताना जपणार सामाजिक भान : सचिन महादेव भंडारे हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची त्यांची निष्ठा व तळमळ असते.त्यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थी संघाच्या कार्याला नवा वेग व ऊर्जा मिळेल, असा विश्वास शिक्षक व गावकऱ्यांनी व्यक्त केला.
सचिन भंडारे व माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे आगामी काळात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता तसेच विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांमध्ये सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
