Shikrapur : मलठण फाटा मार्गावर रंबलर बसवल्याने अपघातांना आळा; ग्रामस्थांचा समाधान व्यक्त

Searajyatimesnews

प्रतिनिधी राजाराम गायकवाड 

शिक्रापूर (ता. शिरूर) मलठण फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर अखेर अत्यावश्यक रंबलर बसवण्यात आल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत अनेक किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडले होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक व शिक्रापूर येथील समस्या ग्रुप यांनी या भागातील धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.(Shikrapur)

मलठण फाटा चौक हा चाकण–शिक्रापूर मार्गावरील अत्यंत वर्दळीचा बिंदू असून, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे पादचारी, विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण होत होता. काही अपघातांमध्ये जीवितहानीही झाली होती. त्यामुळे नागरिकांनी वारंवार लेखी निवेदनांद्वारे आणि स्थानिक पातळीवरील पाठपुराव्याद्वारे रंबलर, चेतावणी फलक आणि वाहतूक नियोजनाची मागणी केली होती.(Shirur)

या मागण्यांचा गंभीरतेने घेत संबंधित विभागाने चाकण चौक ते मलठण फाटा या पट्ट्यातील अपघात संभाव्य ठिकाणी रंबलर बसवण्याचे काम तातडीने पूर्ण केले. त्यामुळे आता या मार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित होत असल्याने अपघातांचे प्रमाण लक्षणीय कमी झाले असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

या उपक्रमाबाबत पुणे जिल्हा भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनापासून आभार मानले. “ग्रामस्थांची दीर्घकाळ प्रलंबित मागणी पूर्ण झाली. प्रशासनाने संवेदनशीलतेने प्रतिसाद देऊन परिसरातील नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य दिले, ही कौतुकास्पद बाब आहे,” असे नागरिकांनी भावना व्यक्त केली. (Pune Ahilyanagar Highway)

ग्रामस्थांनीही समस्या ग्रुपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक करत, आगामी काळात सीसीटीव्ही कॅमेरे, अधिक दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळेस अतिरिक्त प्रकाशव्यवस्था उभारण्यात यावी, अशी अतिरिक्त मागणी केली आहे.(Road Accident)

या कामामुळे मलठण फाटा परिसरात वाहतूक शिस्त प्रस्थापित होऊन, अपघातमुक्त रस्त्याकडे टाकलेले हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!