सराटी (ता.इंदापूर) विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या पंढरपूर वारीत एका २० वर्षांच्या तरुणाचा नीरा नदीच्या पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील गोविंद कल्याण फोके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, यंदाची त्याची पहिलीच वारी आयुष्यातील शेवटची ठरली. मंगळवारी पहाटे सराटीजवळ नीरा नदीत घडलेल्या या घटनेने वारी मार्गावर शोककळा पसरली असून, त्याच्या मृतदेहाचा शोध अद्याप सुरू आहे. आजीच्या काळजाला भिडणाऱ्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
‘कशापायी तू हट्ट केलास रे बाळा?’ पहिली वारी ठरली शेवटची – प्रयागबाई प्रभाकर कराबे या आपल्या लाडक्या नातवासह, गोविंद कल्याण फोके (वय २०) याच्यासोबत संत तुकाराम महाराज पालखी दिंडी क्रमांक १२ मध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. गोविंदची तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेली बहीण यापूर्वी अनेकदा वारीला गेली होती. तिच्या पावलावर पाऊल टाकत, त्यानेही यंदा वारीत जाण्याचा प्रचंड हट्ट धरला होता. फोके परिवार शेती करून गुजराण करतो आणि गोविंद हा नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा होता.
१८ जूनपासून तो श्री देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक १२ मध्ये (संत तुकाराम महाराज पालखी रथामागे) मोठ्या उत्साहात सहभागी झाला होता. एकविशीचा गोविंद अतिशय उत्साही आणि चपळ होता. रोजच्या भजन-कीर्तनात तो हिरीरीने भाग घ्यायचा, रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा. मात्र, हाच उत्साह त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. अकलूजजवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे स्नान करताना, नियतीने त्याच्यावर क्रूर घाला घातला. नदीच्या भोवऱ्यात सापडून तो क्षणातच बेपत्ता झाला.
‘माझ्या लेकीला काय उत्तर देऊ? मी एकटीच कशी जाऊ गावाला?’ आजीचा आर्त टाहो -गोविंद नदीत वाहून जात असताना, त्याची आजी प्रयागबाई कराबे यांनी काळीज पिळवटून टाकणारा एकच टाहो फोडला. “कशापायी तू वारीचा हट्ट केलास रे बाळा… आता मी घरी एकटीच जाऊ का… माझ्या लेकीला काय उत्तर देऊ? मी एकटीच कशी जाऊ गावाला?” असे हुंदके देत रडणाऱ्या त्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय आपोआप थांबले. त्यांच्याही डोळे पाण्याने भरून आले. सकाळी सहा वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या गोविंदचा मृतदेह दिसेनासा झाला. त्यामुळे आजी एकटीच, हताश होऊन नदीच्या किनारी बसून राहिली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.
वारकऱ्यांचा संताप, प्रशासनावर दबाव – प्रशासनालाही मृतदेह शोधून काढण्यात अपयश आल्याने दिंडी क्रमांक १२ मधील वारकरी संतापले. आपल्या सोबतीचा वारकरी पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याने त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आणि अर्धा तासाहून अधिक वेळ रस्ता रोखून धरला. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले. मृतदेह शोधून काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच वारकरी रस्त्यावरून उठले आणि त्यांनी जड अंतःकरणाने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र, दिंडी क्रमांक १२ मधील काही वारकरी त्या रडणाऱ्या आजीसोबत गोविंदचा मृतदेह मिळेपर्यंत थांबले.
गोविंदची ही पहिलीच वारी त्याच्या आयुष्यातील शेवटची वारी ठरली. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन निघालेल्या या निष्पाप तरुणाचा असा अकाली अंत झाल्याने वारी मार्गावर एक दुःखाची आणि हळहळ व्यक्त करणारी भयाण शांतता पसरली आहे.