श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे थाटात उद्घाटन; नवीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
लोणीकंद (ता. हवेली): “संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत – हाच यशाचा खरा मंत्र आहे,” असा मोलाचा संदेश देत श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा/पॉलिटेक्निक) महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे उद्घाटन थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.
२० ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमातून, तंत्रशिक्षणाची आवड निर्माण करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आकाश चौरे यांनी संस्थेच्या १३ वर्षांच्या प्रवासात अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालय आणि तांत्रिक प्रशिक्षणाबद्दल माहिती देत, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश याविषयी माहिती दिली.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम सांगितले. त्यांनी वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन करत, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि कायद्याचे भान ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले. तर, सुरेश तोडकर यांनी विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट’ (SMART) पद्धतीने कार्य करण्याचा सल्ला देत, तंत्रज्ञान देशाच्या प्रगतीसाठी कसे उपयुक्त ठरू शकते यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रा. बोरुडे भीमराव, प्रा. सय्यद गुलनाझ, प्रा. बोलाडे रमेश, प्रा. गुणवरे रामकृष्ण, प्रा. विकास गायकवाड, प्रा. सागर शिंदे, महादेव गोडसे, महेश खरपुडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल दिवटे यांनी केले, तर प्रा. अक्षय खापेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी करिअरची निवड विचारपूर्वक करावी. ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, भूमकर कुटुंबाने शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांना माफक फीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे महान कार्य करत असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. –प्रदीप कंद यांनी, संचाल डी.सी.सी. बँक